९७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल कारवाईत
मुंबई, दि. २ : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी मोहीम राबवत २९ ते ३१ मे २०२६ या कालावधीत विविध जिल्ह्यांमध्ये व्यापक छापेमारी केली. या कारवाईदरम्यान आंबे, बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, गूळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईस्क्रीम, कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाले, शेंगदाणा चिक्की तसेच भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पदार्थांचा सुमारे ९७ लाख १९ हजार ९६३ रुपये किमतीचा तब्बल ८४ हजार ३३५ किलो साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत राज्यातील मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, भंडारा, जालना, बीड, नांदेड, परभणी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये ही विशेष मोहीम राबविण्यात आली. संशयित निकृष्ट व असुरक्षित अन्नपदार्थ, अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया आणि दिशाभूल करणारे पॅकिंग याविरोधात कठोर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान एकूण ४७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. संशयित अन्नपदार्थांचे नमुने संकलित करून पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळांकडे पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गुळामध्ये साखरेच्या भेसळीचा पर्दाफाश
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील तीन ठिकाणी गुळामध्ये साखरेची भेसळ होत असल्याचे तपासात उघड झाले. या कारवाईत सुमारे १० लाख ६६ हजार २४२ रुपये किमतीचा १५ हजार ९६ किलो साखरेचा साठा जप्त करण्यात आला. ही साखर गुळामध्ये भेसळ करण्यासाठी वापरली जात असल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपास यंत्रणांनी नोंदविला आहे.
कृत्रिमरीत्या आंबे पिकविणाऱ्यांवर कारवाई
नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आंबे कृत्रिमरीत्या पिकविण्यासाठी इथिलीन स्प्रे तसेच संशयास्पद द्रव पदार्थांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सुमारे ११ लाख १२ हजार ८५० रुपये किमतीचे आंबे जप्त करण्यात आले. ग्राहकांच्या आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या अशा प्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
भेसळखोरांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल होणार
अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध केवळ दंडात्मक नव्हे तर फौजदारी कारवाईही करण्यात येणार आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १२९ अंतर्गत गुन्हे दाखल करून भेसळ, प्रतिबंधित पदार्थांची विक्री, असुरक्षित अन्न उत्पादन आणि गुटखा विक्रीसारख्या प्रकारांवर कठोर पावले उचलण्यात येणार आहेत.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या “सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे, सुरक्षित महाराष्ट्र” या संकल्पनेअंतर्गत ही मोहीम राबविण्यात येत असून जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा आस्थापनेला कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी तक्रारी पुढे आणाव्यात
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास किंवा भेसळीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. तक्रार करताना तक्रारदाराचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता तसेच कोणत्या अन्नपदार्थामध्ये भेसळ होत आहे याची सविस्तर माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून स्वतंत्र भ्रमणध्वनी अनुप्रयोग विकसित करण्याचे काम सुरू असून नागरिकांसाठी स्वतंत्र टोल-मुक्त दूरध्वनी सेवा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्यातील अन्न सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्राहकांना सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अशा धडक मोहिमा यापुढेही सातत्याने सुरू राहतील, असा निर्धार अन्न व औषध प्रशासनाने व्यक्त केला आहे.
