कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वदेशी तंत्रज्ञान नवोन्मेषांना चालना
मुंबई, दि. १४ : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी मुंबई येथील Centre for Development of Advanced Computingप्रगत संगणन विकास केंद्राला अर्थात सी-डॅकला भेट देत ‘सत्या ऑरा’ या अत्याधुनिक स्मार्ट ब्राउझर आधारित वापर सुलभता प्रणालीचे लोकार्पण केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वदेशी तंत्रज्ञान विकास आणि डिजिटल समावेशकतेच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
सी-डॅक मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी विविध संशोधन प्रकल्प, नवोन्मेष उपक्रम आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. ‘सत्या ऑरा’ प्रणालीमुळे संकेतस्थळे अधिक वापरकर्ता स्नेही होणार असून दृष्टिदोष, श्रवणदोष, हालचालींमध्ये अडचण असलेले नागरिक, मज्जासंस्थेशी संबंधित समस्या असलेले वापरकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक यांना डिजिटल सेवांचा अधिक सुलभ अनुभव मिळणार आहे.
सी-डॅककडून विकसित करण्यात आलेली ही प्रणाली डिजिटल समावेशकतेला चालना देणारी असून विविध क्षमतांच्या वापरकर्त्यांसाठी संकेतस्थळे अधिक सुलभ बनविण्याचा तिचा उद्देश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सहाय्यक तंत्रज्ञानाचा वापर करून ही सुविधा वापरकर्त्यांच्या गरजेनुसार कार्य करते.
या भेटीदरम्यान सार्वजनिक हितासाठीचे माहितीसाठा केंद्र, विज्ञान नवोन्मेष आणि विकास प्रतिष्ठान, बंगळुरु येथील भारतीय विज्ञान संस्था आणि सी-डॅक यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक सार्वभौम पायाभूत सुविधा, सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, मुक्त मानके, उत्तरदायित्व आराखडा आणि परस्पर समन्वयित तंत्रज्ञान विकास या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे.
या कराराची देवाणघेवाण सी-डॅक मुंबईचे कार्यकारी संचालक आदित्य कुमार सिन्हा आणि भारतीय विज्ञान संस्थेतील भू-स्थानिक विभागाचे संचालक तसेच मुख्य शास्त्रज्ञ ज्योतिर्मय दत्ता यांच्या हस्ते करण्यात आली. या उपक्रमामुळे देशातील संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
कार्यक्रमात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी सुसंगत संशोधन आणि स्वदेशी तंत्रज्ञान विकासासाठी सी-डॅकच्या योगदानाचे कौतुक केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, ब्लॉकचेन आणि प्रगत संगणकीय तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये भारताने जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
देशातील संशोधन आणि विकास क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सांगताना त्यांनी युवा संशोधक, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवउद्योजकांना अधिक संसाधने आणि संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला. नवोन्मेष संस्कृती रुजविण्यासाठी शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्रे आणि उद्योग क्षेत्र यांच्यात समन्वय वाढविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास सी-डॅकचे कार्यकारी संचालक आदित्य कुमार सिन्हा, वरिष्ठ वैज्ञानिक, संशोधक, तंत्रज्ञान तज्ज्ञ तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारताच्या डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने सी-डॅकचे कार्य महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
