भटके विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्यासोबत समाजाच्या शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा
मुंबई, दि. १३ : राज्यातील अतिमागास भटके विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी भटके विमुक्त विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची मुंबईतील लोकभवन येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे यांनी केले.
या बैठकीत भटके विमुक्त समाजाच्या शिक्षण, आरोग्य, शासकीय योजनांचा लाभ, ओळखपत्रे तसेच विविध शासकीय नोंदींसाठी आवश्यक कागदपत्रांच्या समस्यांवर विशेष चर्चा करण्यात आली. समाजातील अनेक कुटुंबांकडे जातीचे दाखले, आधार कार्ड, निवासी पुरावे आणि इतर आवश्यक कागदपत्रांचा अभाव असल्याने शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत असल्याची बाब शिष्टमंडळाने राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी शिष्टमंडळाशी संवाद साधताना भटके विमुक्त समाजाच्या समस्या संवेदनशीलतेने हाताळल्या जातील, असे आश्वासन दिले. तसेच राज्यातील अतिमागास भटक्या विमुक्त समाजातील प्रतिनिधींना लोकभवन येथे निमंत्रित करून त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.
यावेळी शिष्टमंडळाने धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असलेल्या यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलाला भेट देण्याचे निमंत्रण राज्यपालांना दिले. या परिसरात भटके विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, तेथील उपक्रमांची माहितीही राज्यपालांना देण्यात आली.
तसेच दरवर्षी ३१ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणाऱ्या विमुक्त दिनानिमित्त आयोजित कागदपत्र वितरण कार्यक्रमासाठीही राज्यपालांना निमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमात जातीचे दाखले, आधार कार्ड आणि इतर शासकीय कागदपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.
या बैठकीस भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय पुरी, कार्यवाह नरसिंग झरे, कोषाध्यक्ष नरेश पोटे, विदर्भ संयोजक राजेंद्र दोनाडकर, प्रांत सहसंयोजक शरद मखर तसेच राहुल चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील भटके विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत या चर्चेदरम्यान व्यक्त करण्यात आले.
