वनमंत्री गणेश नाईक यांचे नवी मुंबईकरांना ऑनलाईन सहभागाचे आवाहन
नवी मुंबई, दि. २ : देशाच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासासाठी होणारी जनगणना २०२७ ही अत्यंत महत्त्वाची असून नागरिकांनी ‘स्व जनगणना’ उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मेपासून सुरू झालेल्या ऑनलाईन स्व जनगणना मोहिमेत सहभागी होत त्यांनी स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरून नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला.
जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी स्वतः माहिती भरल्यास ती अधिक अचूक आणि विश्वासार्ह राहते. त्यामुळे प्रत्येकाने भारत सरकारने उपलब्ध करून दिलेल्या ‘स्व जनगणना’ सुविधेचा लाभ घेत राष्ट्रीय कार्यात पुढाकाराने सहभागी व्हावे, असे आवाहन गणेश नाईक यांनी यावेळी केले. त्यांनी घराची स्थिती, कुटुंबातील सदस्यांची माहिती, उपलब्ध सुविधा आणि विविध सामाजिक घटकांशी संबंधित एकूण ३३ प्रश्नांची माहिती ऑनलाईन भरत स्व जनगणना पूर्ण केली.
यावेळी नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, शहर जनगणना अधिकारी तथा उपआयुक्त संजय शिंदे यांची उपस्थिती होती. महापौर श्रीमती सुजाता पाटील यांनीदेखील स्वतः स्व जनगणना पूर्ण करून नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. देश, राज्य आणि शहराच्या विकासासाठी अचूक लोकसंख्यात्मक माहिती अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मेपासून सुरुवात झाली असून हा टप्पा १५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती ऑनलाईन भरता येणार आहे. माहिती भरल्यानंतर नागरिकांना एक विशेष कोड किंवा नोंदणी क्रमांक दिला जाणार असून तो क्रमांक पुढील टप्प्यात घरी भेट देणाऱ्या प्रगणक अधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक अधिकारी घराघरांत जाऊन माहितीची पडताळणी करणार आहेत. या वेळी नागरिकांनी आवश्यक ती खरी आणि अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनीही नागरिकांना स्व जनगणनेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन केले. ही माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असून तिचा वापर केवळ राष्ट्रीय नियोजन आणि विकासासाठीच केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक, निवास आणि सामाजिक कल्याण योजनांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी जनगणनेतील माहिती महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
जनगणना २०२७ ही देशातील पहिली पूर्णपणे डिजिटल स्वरूपातील जनगणना मानली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक, अचूक आणि जलद माहिती संकलन करण्यावर भर देण्यात आला आहे. ‘स्व जनगणना’ प्रक्रियेला प्राधान्य देत नागरिकांना मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून घरबसल्या माहिती भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना ऑनलाईन माहिती भरताना कोणतीही अडचण आल्यास मदत केंद्रे आणि स्थानिक प्रशासनाची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवी मुंबईसह राज्यभरातील नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून देशाच्या भविष्यासाठी आवश्यक असलेल्या विकास आराखड्याला हातभार लावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
