“आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी समित्यांचे पुनरुज्जीवन आवश्यक” – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. २६ : राज्यातील आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारून नागरिकांना अधिक परिणामकारक व पारदर्शक सेवा देण्यासाठी आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत कार्यरत असलेल्या सर्व आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली.
राज्यात ग्रामीण व शहरी भागात विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी रुग्ण कल्याण समिती, जन आरोग्य समिती, महिला आरोग्य समिती तसेच ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मंत्री आबिटकर यांनी नमूद केले.
ग्रामीण भागात ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती कार्यरत असून स्वच्छता, पोषण, पाणीपुरवठा आणि प्राथमिक आरोग्य सेवा यामध्ये या समित्या महत्त्वाची भूमिका बजावतात. शहरी भागात महिला आरोग्य समितीच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर महिलांचा सहभाग वाढवून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जातो.
त्याचप्रमाणे जन आरोग्य समिती व रुग्ण कल्याण समिती या आरोग्य संस्थांमधील सेवा गुणवत्तेवर देखरेख ठेवून रुग्णकेंद्रित सेवा, निधीचा पारदर्शक वापर आणि सुविधा सुधारण्याचे काम करतात. या समित्यांच्या माध्यमातून स्थानिक गरजांनुसार निर्णय घेणे शक्य होत असल्याने त्यांचे सक्रिय असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्राम स्तरावरील समित्यांमध्ये ग्रामपंचायत सरपंच, महिला सदस्य, बचत गट, तरुण मंडळ, सामाजिक संस्था, गरोदर व स्तनदा माता तसेच आरोग्य सेवा घेतलेले नागरिक यांचा सहभाग अपेक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शहरी भागात महिला आरोग्य समितीत समाजाभिमुख व नेतृत्वगुण असलेल्या महिलांचा समावेश करून स्थानिक आरोग्य प्रश्न सोडवण्यावर भर देण्यात येणार आहे.
जन आरोग्य समित्यांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, आरोग्यदूत, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, युवक तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांतील रुग्ण कल्याण समित्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश करून व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा उद्देश आहे.
या सर्व समित्यांच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेत लोकप्रतिनिधी, प्रशासन, अधिकारी व समाजातील सेवाभावी घटक यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मंत्री आबिटकर यांनी केले. समित्यांच्या नियमित बैठका घेऊन स्थानिक समस्यांवर कृती आराखडे तयार करणे, सदस्यांचे प्रशिक्षण व क्षमता विकास करणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय वाढवणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
“आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक आहे. स्थानिक स्तरावर गरजा ओळखून तत्काळ उपाययोजना केल्यास नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल,” असे प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
राज्यातील खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी या उपक्रमात पुढाकार घ्यावा तसेच आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आवश्यक सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले. या माध्यमातून राज्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
