घाटातील वाहतूक कोंडी व अपघातांना मोठा दिलासा
मुंबई, दि. २६ : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग या महत्त्वाच्या द्रुतगती मार्गावरील घाट विभागाला बायपास देणारा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून त्याचे लोकार्पण दि. १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झालेल्या या प्रकल्पामुळे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. “मी स्वतः येऊन कामाचा दर्जा तपासला असून तो समाधानकारक आहे. उर्वरित किरकोळ कामे काही दिवसांत पूर्ण होतील. काम वेळेत आणि उच्च गुणवत्तेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत,” असे त्यांनी सांगितले.
सुमारे १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन मोठे बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅली परिसरात सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील अत्यंत रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. ७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करणे मोठे आव्हान होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे पूर्णपणे टाळली जाणार असून प्रवासाचा वेळ सुमारे २० ते ३० मिनिटांनी कमी होईल. “या प्रकल्पामुळे घाटातील अपघात जवळपास शून्यावर येतील,” असा ठाम दावा शिंदे यांनी केला. यामुळे इंधन बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणात घट होणार आहे.
या प्रकल्पामुळे द्रुतगती मार्गाचे एकूण अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार आहे. प्रारंभी बस आणि हलक्या वाहनांना प्राधान्य देण्यात येणार असून वाहतूक कोंडी कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. टोलवाढीबाबत स्पष्ट करताना शिंदे म्हणाले की, “या प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. खालापूर टोल नाक्यावरही वाढ प्रस्तावित नाही.”
सुमारे ६७०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प दि. २०१९ साली मंजूर झाला होता. त्या वेळी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात यास मान्यता मिळाली होती आणि आता त्यांच्या हस्तेच त्याचे लोकार्पण होणार असल्याचे विशेष असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गामुळे राज्यातील उद्योग, आयटी, सेवा क्षेत्र आणि स्थावर मालमत्ता क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे या मार्गाची कार्यक्षमता आणखी वाढणार आहे. तसेच लोहगड किला, विसापूर किल्ला आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांना अधिक चांगली जोडणी मिळणार आहे.
या प्रकल्पातील बोगद्यांना गडकिल्ले आणि कार्ला लेण्यांच्या प्रतीकृतींप्रमाणे सजवण्यात आले असून त्यांची गुणवत्ता अबाधित राहील याची विशेष काळजी घेण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
“अशा पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे केवळ प्रवास सुलभ होत नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळते. कनेक्टिव्हिटी मजबूत असेल तर उद्योग आणि रोजगाराच्या संधी वाढतात,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
पुढील काळात समृद्धी महामार्ग, कोकण कोस्टल रोड आणि वसई–विरार मल्टीमोडल कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांशी जोडून राज्यात ऍक्सेस कंट्रोल रस्त्यांचे जाळे उभारण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. “महाराष्ट्रात कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात ७ ते ८ तासांत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे यांदरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असून राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
