कृषी वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी
मुंबई, दि. ८ : राज्यातील वीज वितरण व्यवस्थेला अधिक सक्षम व शाश्वत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) यांच्या आर्थिक पुनर्रचनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार वीज वितरण क्षेत्राचे विभाजन करून दोन स्वतंत्र कंपन्या स्थापन करण्यात येणार असून, त्यामध्ये कृषी आणि बिगर कृषी ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सेवा रचना विकसित केल्या जाणार आहेत.
या पुनर्रचनेनुसार औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती तसेच इतर बिगर कृषी ग्राहकांसाठी महावितरण ही स्वतंत्र वितरण कंपनी कार्यरत राहणार आहे. तर कृषी ग्राहकांना वीज पुरवठा आणि संबंधित सेवा देण्यासाठी ‘एमएसईबी सोलार ॲग्रो पॉवर लिमिटेड’ (एमएसएपीएल) ही स्वतंत्र कंपनी कार्यरत राहील. या दोन्ही कंपन्यांचे महसूल, खर्च आणि वीज विक्रीचे लेखापरीक्षण स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.
याचबरोबर महावितरण कंपनीला भांडवली बाजारात सूचीबद्ध करण्यासाठी आयपीओ आणण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. विभाजन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारण सहा ते नऊ महिन्यांच्या कालावधीत आयपीओ आणण्याची प्रक्रिया सुरू होईल. या आयपीओमध्ये नवीन समभाग निर्गम (फ्रेश इश्यू) तसेच शासनाकडील समभाग विक्री (ऑफर फॉर सेल) या माध्यमातून निधी उभारला जाणार आहे.
महावितरणने विविध पायाभूत प्रकल्पांसाठी घेतलेल्या सुमारे ३२ हजार ६७९ कोटी रुपयांच्या कर्जासाठी शासन हमी असून, या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी राज्य सरकार दीर्घकालीन, सुमारे पंधरा वर्ष मुदतीचे रोखे जारी करणार आहे. यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र वितरण कंपनी उभारण्यामागे शेतीसाठी वीज पुरवठा अधिक नियोजनबद्ध व शाश्वत करण्याचा उद्देश आहे. सौर ऊर्जेवर आधारित कृषि वीज प्रणाली विकसित करण्यासाठी या कंपनीच्या माध्यमातून आवश्यक पायाभूत रचना निर्माण करण्यात येणार आहे. या नव्या कृषी वितरण कंपनीस प्रारंभी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे भांडवल उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे कृषी तसेच औद्योगिक आणि घरगुती ग्राहकांना अधिक स्थिर व अखंडित वीज पुरवठा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असून, सौर ऊर्जेच्या वापराला चालना मिळणार आहे.
तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी विश्वासार्ह वीजपुरवठा उपलब्ध झाल्यास उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल, तर घरगुती ग्राहकांसाठी सेवा गुणवत्तेत सुधारणा, डिजिटल बिलिंग आणि ग्राहक सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. दरांमध्ये स्थिरता राखण्याचाही प्रयत्न या पुनर्रचनेतून होणार असल्याचे संकेत आहेत.
एकूणच, वीज वितरण क्षेत्रातील ही पुनर्रचना ऊर्जा सुरक्षेला बळकटी देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यास आणि हरित ऊर्जेकडे संक्रमणाला गती देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी मानली जात आहे.
