भारताने इंग्लंडवर १०० धावांनी विजय मिळवत सहाव्यांदा जिंकला अंडर-१९ एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक
फायनल सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. ४१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ ४१ व्या षटकात ३११ धावांत गारद झाला. वैभव सूर्यवंशीच्या दमदार १७५ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने ५० षटकांत ९ बाद ४११ धावा केल्या. वैभवने ८० चेंडूंमध्ये १५ चौकार आणि १५ षटकारांच्या मदतीने ही झंझावाती खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने युवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० धावा (७१ चेंडूंत) करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. तसेच, आयसीसीच्या कोणत्याही एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील ही सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे.
कर्णधार आयुष म्हात्रेने वैभवला उत्तम साथ देत ५३ धावांचे योगदान दिले. अंडर-१९ विश्वचषकाच्या इतिहासात ४०० पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम भारताने तिसऱ्यांदा केला आहे. यापूर्वी भारताने २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ या वर्षांत अंडर-१९ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते.
