१२ जिल्हा परिषदांतील १२५ पंचायत समित्यांसाठी उमेदवारी अर्जांची आज छाननी; २७ जानेवारीला अंतिम यादी
मुंबई, दि. २२: राज्यातील १२ जिल्हा परिषदांअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज सुरू आहे. छाननीनंतर वैध उमेदवारांची प्राथमिक यादी जाहीर केली जाणार असून, त्यानंतर निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्पे राबवले जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगकडून देण्यात आली.
छाननी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २३, २४ आणि २७ जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे. या तीनही दिवशी दुपारी ११ ते ३ या वेळेत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. विशेष म्हणजे २७ जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुपारी साडेतीननंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. याचवेळी संबंधित उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. मतदान सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडेल. या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (EVM) वापर केला जाणार असून, मतदारांना जिल्हा परिषदेसाठी एक आणि पंचायत समितीच्या गणासाठी एक अशी दोन मते देता येणार आहेत.
दरम्यान, या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने अनेक ठिकाणी चुरशीच्या लढतीचे चित्र दिसून येत आहे. छाननीनंतर काही अर्ज बाद होण्याची शक्यता असून, त्यानंतरच राजकीय पक्षांची आणि आघाड्यांची खरी ताकद स्पष्ट होणार आहे. अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला अधिक वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्याच्या ग्रामीण राजकारणाच्या दृष्टीने या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात असून, निकालांकडे सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष लागले आहे.
