“आता आपण भांडत राहिलो, तर त्यांना फायदा होईल” – उद्धव ठाकरे
मुंबई, दि. २४ : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण साकार झाला. अनेक वर्षांच्या राजकीय मतभेदांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अखेर युतीची अधिकृत घोषणा केली. मराठी अस्मिता, महाराष्ट्राचे हित आणि राज्याच्या भविष्यासाठी एकत्र येत असल्याचे या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले.
आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “दिल्लीत बसलेल्यांचे मनसुबे अनेक आहे. आता आपण भांडत राहिलो, तर त्यांना फायदा होईल. मी मागे म्हटलं, तसं एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी”. तर राज ठाकरे यांनी सांगितले, “कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कोण किती जागा लढवणार , हे आता सांगणार नाही”.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील मतभेद जवळपास दोन दशकांपासून सर्वज्ञात होते. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत आणि राज्यातील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या युतीची गरज असल्याचे दोन्ही बाजूंनी मान्य करण्यात आले.
या युतीचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा सन्मान, स्थानिक तरुणांना रोजगार, महाराष्ट्रातील उद्योगांचे संरक्षण आणि राज्याच्या स्वायत्ततेचे रक्षण हा असल्याचे सांगण्यात आले. आगामी निवडणुकांमध्ये ही युती संयुक्तपणे लढणार असल्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
या युतीच्या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, अनेक ठिकाणी फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. दुसरीकडे विरोधी पक्षांकडून या युतीवर टीका आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत.
युतीची औपचारिक रूपरेषा, जागावाटप आणि संयुक्त कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. आजची ही घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरेल, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
