राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली घोषणा
मुंबई, दि. १५: बृहन्मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान; तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली.
येथील सह्याद्री अतिथीगृहात महानगरपालिका निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. वाघमारे यांनी सांगितले की, सर्व महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून राबविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना १६ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होईल. उर्वरित सर्व २८ महानगरपालिकांची अधिसूचना १८ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर पार पाडतील. सर्व महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.
महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर ४ नोव्हेंबर २०२५ रोजी कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातदेखील आदेश निर्गमित केले आहेत.
महानगरपालिकांची नावे
राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी जालना आणि इचलकरंजी या २ नवनिर्मित महानगरपालिका आहेत. ५ महानगरपालिकांची मुदत २०२० मध्ये संपली आहे. सर्वाधिक १८ महानगरपालिकांची मुदत २०२२ मध्ये संपली होती; तर ४ महानगरपालिकांची मुदत २०२३ मध्ये संपली आहे. मुदत समाप्तीची महानगरपालिकानिहाय तारीख अशी: छत्रपती संभाजीनगर: २७ एप्रिल २०२०, नवी मुंबई: ०७ मे २०२०, वसई- विरार: २८ जून २०२०, कल्याण- डोंबिवली: १० नोव्हेंबर २०२०, कोल्हापूर: १५ नोव्हेंबर २०२०, नागपूर: ०४ मार्च २०२२, बृहन्मुंबई: ०७ मार्च २०२२, सोलापूर: ०७ मार्च २०२२, अमरावती: ०८ मार्च २०२२, अकोला: ०८ मार्च २०२२, नाशिक: १३ मार्च २०२२, पिंपरी- चिंचवड: १३ मार्च २०२२, पुणे: १४ मार्च २०२२, उल्हासनगर: ०४ एप्रिल २०२२, ठाणे: ०५ एप्रिल २०२२, चंद्रपूर: २९ एप्रिल २०२२, परभणी: १५ मे २०२२, लातूर: २१ मे २०२२, भिवंडी- निजामपूर: ०८ जून २०२२, मालेगाव: १३ जून २०२२, पनवेल: ९ जुलै २०२२, मीरा- भाईंदर: २७ ऑगस्ट २०२२, नांदेड- वाघाळा: ३१ ऑक्टोबर २०२२, सांगली- मीरज- कुपवाड: १९ ऑगस्ट २०२३, जळगाव: १७ सप्टेंबर २०२३, अहिल्यानगर: २७ डिसेंबर २०२३, धुळे: ३० डिसेंबर २०२३, जालना: नवनिर्मित आणि इचलकरंजी: नवनिर्मित.
बहुसदस्यीय पद्धत
बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व २८ महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व २८ महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा असतील काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असतील. त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने किमान ३ ते ५ मते देणे अपेक्षित असेल.
नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीने
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे; परंतु विविध राजकीय पक्ष आणि नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.
‘जातवैधता पडताळणी’बाबत
राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. जात प्रमाणपत्र असेल; परंतु जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक राहील. “सहा महिन्यांच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येईल,” असे हमीपत्रदेखील संबंधित उमेदवारांना द्यावे लागेल. या विहित मुदतीत म्हणजे निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल.
मतदान केंद्र आणि ईव्हीएम
महानगरपालिका निवडणुकांसाठी ३ कोटी ४८ लाख ७८ हजार ०१७ मतदार असून त्यासाठी ३९ हजार १४७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ४३ हजार ९५८ कंट्रोल युनिट आणि ८७ हजार ९१६ बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे १० हजार १११ मतदान केंद्रांसाठी ११ हजार ३४९ कंट्रोल युनिट आणि २२ हजार ६९८ बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
संभाव्य दुबार मतदारांबाबत दक्षता
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरल्या जातात. संबंधित कायद्यांतील तरतुदींनुसार राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित करून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय विभाजित केल्या आहेत.
प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाल्या आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी २० डिसेंबर २०२५ रोजी; तर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या २७ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
‘मताधिकार’ मोबाईल ॲप
महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे.
मतदार व मतदान केंद्र
पुरुष मतदार- १,८१,९३,६६६
महिला मतदार- १,६६,७९,७५५
इतर मतदार- ४,५९६
एकूण मतदार- ३,४८,७८,०१७
एकूण मतदान केंद्र- ३९,१४७
जागा व आरक्षित जागा
महानगरपालिकांची संख्या- २९
एकूण प्रभाग- ८९३
एकूण जागा- २,८६९
महिलांसाठी जागा- १,४४२
अनुसूचित जातींसाठी जागा- ३४१
अनुसूचित जमातींसाठी जागा- ७७
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- ७५९
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा
बृहन्मुंबई आणि ‘अ’ वर्ग महानगरपालिका (पुणे व नागपूर)- रु. १५,००,०००/-
‘ब’ वर्ग महानगरपालिका (पिंपरी-चिंचवड, नाशिक व ठाणे) – रु. १३,००,०००/-
‘क’ वर्ग महानगरपालिका (कल्याण-डोंबिवली, नवी मुबई, छ. संभाजीनगर व वसई-विरार)- रु. ११,००,०००/-
‘ड’ वर्ग महानगरपालिका (उर्वरित सर्व १९)- रु. ०९,००,०००/-
महत्वाच्या तारखा
नामनिर्देशनपत्र स्वीकारणे- २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५
नामनिर्देशनपत्रांची छाननी – ३१ डिसेंबर २०२५
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत- ०२ जानेवारी २०२६
निवडणूक चिन्ह वाटप- ०३ जानेवारी २०२६
अंतिम उमेदवारांची यादी- ०३ जानेवारी २०२६
मतदानाचा दिनांक- १५ जानेवारी २०२६
मतमोजणीचा दिनांक- १६ जानेवारी २०२६
