राकेश कुमार नामक कथित वकिलाने केला हल्ला
नवी दिल्ली, दि. ६: सर्वोच्च न्यायालयात आज एक धक्कादायक घटना घडली. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका कथित वकिलाने चक्क शूज हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचं झालं असं की आज सकाळी सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी चालू होती. यावेळी राकेश कुमार नामक एक कथित वकिल सरन्यायाधीश गवई यांच्या आसनाजवळ आला व त्याने आपलं पादत्राण काढून त्यांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु, या वकिलास वेळीच रोखण्यात आलं. यानंतर पोलीस जेव्हा त्याला न्यायालयाच्या बाहेर घेऊन जात होते तेव्हा त्याने, “सनातन चा अपमान सहन केला जाणार नाही” अशी घोषणाबाजी केली.
हि घटना घडल्यानंतर काही वेळाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या वतीने एका प्रतिक्रिया आली. ते म्हणाले की अशा घटनांचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. गेल्या महिन्यात, १६ डिसेंबर रोजी खजुराहो येथील भगवान विष्णू च्या जीर्ण मूर्तीसंदर्भातील सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणी नंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर हिंदुत्व वाद्यांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती. यावेळी त्यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबावर वैयक्तिक पातळीवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्टीकरण दिलं कि मी सर्व धर्मांचा सन्मान करतो, माझा हेतू कोणाला दुखावण्याचा नव्हता. अशा प्रकारे देशाच्या सर्वोच्च न्यायालयात तेही सरन्यायाधीशावर झालेला हल्ला हि एक दुर्मिळ व गंभीर घटना आहे. सर्व स्तरांमधून या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे.
