टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न
मुंबई, दि. १९: मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक आणि संयोजक अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने लॉरेन्स बिश्नोईचा उल्लेख करताना वापरलेल्या संबोधनावर आक्षेप घेतला आहे. गुन्हेगारांशी वागताना दाखवली जाणारी नम्रता विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांच्या बाबतीतही दाखवावी, अशी टीका त्यांनी समाजमाध्यमांवर केली.
दिपके यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर दिल्लीतील पत्रकार परिषदेसंबंधीचा एक जूना व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यामध्ये पूर्व दिल्लीचे पोलीस उपायुक्त अभिषेक धनिया यांनी लॉरेन्स बिश्नोईचा उल्लेख “लॉरेन्स बिश्नोई साहब” असा केल्याचे दिसते. यावर प्रतिक्रिया देताना दिपके यांनी विद्यार्थी आणि कार्यकर्ते केवळ आंदोलन करत असताना त्यांच्याशी पोलिसांनी तितक्याच सौजन्याने वागावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दुसऱ्या पोस्टमध्येही त्यांनी पोलिसांनी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रत्यक्ष गुन्हे करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करावे, असे म्हटले. सरकार आणि पोलिसांच्या प्राधान्यक्रमातच गोंधळ असल्यास अशा परिस्थिती उद्भवतात, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, टायगर श्रॉफच्या वाहनावर झालेल्या गोळीबाराचा तपास मुंबई पोलिसांनी वेगाने सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अभिनेता एका मैदानातून स्वतःच्या वाहनाने निघत असताना हा प्रकार घडला. त्याला पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. या गर्दीतूनच गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेत तीन ते चार गोळ्या झाडण्यात आल्याचे वृत्त आहे. टायगर श्रॉफला कोणतीही गोळी लागली नाही. मात्र, त्याचा चालक फिरदौस याच्या डाव्या हाताला गोळी लागून तो जखमी झाला. या गोळीबारात आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे.
गोळीबार केल्यानंतर तिघेही आरोपी लोकल ट्रेन ने वसईला गेले व त्यांनी जयपूर ला जाणारी ट्रेन पकडली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या गोपनीय माहितीचा आधारे आज सकाळी कोटा पोलिसांनी सर्व आरोपींना कोटा रेल्वे स्थानकावर उतरल्या-उतरल्या अटक केली.

