रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक संपन्न
मुंबई, दि. ०१: गेल्या दोन दिवसांपासून रेपो दरात कपात होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या ज्याला आता पूर्णविराम बसला आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक नुकतीच पार पडली ज्यात रेपो दरात कोणतेही बदल केले गेले नाहीत. परंतु, दुसऱ्या बाजूला आरबीआय ने चालू बँक खातेधारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. चालू झिरो बॅलन्स असणाऱ्या बँक खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. पतधोरण आढावा समितीच्या बैठकीतले निर्णय जाहीर करताना गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. ग्राहकांच्या सोयीसुविधा, बँकिग क्षेत्र मजबूत करणे, कर्ज पुरवठा वाढवणे, व्यवसाय सुलभता, परकीय चलन व्यवहार आणि रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण याला चालना देण्यासाठी त्यांनी २२ सुधारणा जाहीर केल्या.
Source – AIR
