पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम.एस.स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
नवी दिल्ली, दि. ७: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील आयसीएआर- पुसा येथे आयोजित करण्यात आलेल्या एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. प्राध्यापक एम एस स्वामिनाथन हे एक द्रष्टे होते ज्यांचे योगदान कोणत्याही एका युगापुरते सीमित नव्हते , असे त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी सांगितले. प्राध्यापक स्वामिनाथन हे एक थोर शास्त्रज्ञ होते ज्यांनी विज्ञानाला लोकसेवेचे माध्यम बनवले असे ते म्हणाले. राष्ट्राला अन्नसुरक्षा बहाल करण्यासाठी प्राध्यापक स्वामिनाथन यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे त्यांनी अधोरेखित केले. प्राध्यापक स्वामिनाथन यांनी एक अशी चेतना निर्माण केली जी भारताच्या पुढील अनेक शतकांच्या धोरणांमध्ये आणि प्राधान्यक्रमांमध्ये झळकत राहील, असे पंतप्रधान म्हणाले. एम.एस.स्वामीनाथन शताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी यावेळी आजच्या राष्ट्रीय हातमाग दिनाचाही उल्लेख केला. गेल्या दहा वर्षात हातमाग क्षेत्राने संपूर्ण देशभरात एक नवीन ओळख आणि सामर्थ्य प्राप्त केले आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त त्यांनी सर्वांना विशेषतः या क्षेत्राशी संबंधितांना शुभेच्छा दिल्या.
डॉ एम.एस.स्वामीनाथन यांच्यासोबतच्या कित्येक वर्षांच्या संबंधांना उजाळा देत पंतप्रधानांनी पूर्वीच्या काळी गुजरातमध्ये असलेल्या स्थितीबद्दल सांगितले, ज्यावेळी दुष्काळ आणि वादळांमुळे तेथील कृषिक्षेत्रासमोर मोठे आव्हान असायचे. त्यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मृदा आयोग्य पत्रिका या उपक्रमावर कार्य सुरु झाले असे सांगून या उपक्रमात प्राध्यापक स्वामिनाथन यांनी खूप स्वारस्य दाखवले तसेच खुल्या दिलाने अनेक शिफारसी केल्या आणि या योजनेच्या यशस्वितेत मोठे योगदान दिले, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी जवळजवळ वीस वर्षांपूर्वी, तामिळनाडूतील प्राध्यापक स्वामीनाथन यांच्या रिसर्च फाउंडेशन सेंटरला, भेट दिल्याचा उल्लेख केला. २०१७ मध्ये त्यांना प्राध्यापक स्वामीनाथन यांचे ‘द क्वेस्ट फॉर अ वर्ल्ड विदाऊट हंगर’ हे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी मिळाली. २०१८ मध्ये वाराणसी येथे उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेच्या प्रादेशिक केंद्राच्या उदघाटनप्रसंगी प्राध्यापक स्वामिनानाथन यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्राध्यापक स्वामीनाथन यांच्याबरोबर झालेली प्रत्येक भेट हा शिकण्याचा अनुभव होता असे सांगून त्यांनी प्राध्यापक स्वामीनाथन यांनी एकदा “विज्ञान हे केवळ शोधापुरते मर्यादित नव्हे तर सर्वांपर्यंत पोहचवणे आहे” असे म्हटल्याचे नमूद केले. प्राध्यापक स्वामीनाथन यांनी आपले विचार आपल्या कृतीतून सिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले. प्राध्यापक स्वामीनाथन यांनी केवळ संशोधन केले नाही तर त्यांनी शेतकऱ्यांना कृषीपद्धतींमध्ये परिवर्तन घडवण्यास प्रवृत्त केले. आज देखील प्राध्यापक स्वामीनाथन यांच्या कल्पना आणि दृष्टिकोन भारताच्या कृषी क्षेत्रात रुजलेला असल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले. भारतमातेचे खरे रत्न असे वर्णन करून, पंतप्रधानांनी प्राध्यापक स्वामीनाथन यांना त्यांच्या सरकारच्या काळात भारतरत्न प्रदान करण्यात येणे हे आपले सौभाग्य असल्याचे मत व्यक्त केले.
डॉ एम.एस.स्वामीनाथन यांनी भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्याच्या चळवळीचे नेतृत्त्व केले असे सांगून प्राध्यापक स्वामीनाथन यांची ओळख हरितक्रांतीच्याही पलीकडे असल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्राध्यापक स्वामीनाथन यांनी रसायनांच्या वाढत्या वापराचे दुष्परिणाम आणि एकाच पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीबद्दल शेतकऱ्यांमध्ये सातत्याने जागरूकता निर्माण केली. प्राध्यापक स्वामीनाथन यांनी अन्नधान्य उत्पादन वृद्धीसाठी कार्य केले असले तरी पर्यावरण आणि धरणीमातेप्रती त्यांना नेहमीच कळकळ वाटत असे. या दोन्हींमध्ये संतुलन राखत असतानाच नवनवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी प्राध्यापक स्वामीनाथन यांनी सदाहरित क्रांतीची संकल्पना मांडली. प्राध्यापक स्वामीनाथन यांनी सामुदायिक बियाणे बँका आणि लाभदायी पिके यासारख्या नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन दिले, असे पंतप्रधान म्हणाले.
हवामान बदल आणि पोषणासंबंधित आव्हानांवर विस्मृतीत गेलेल्या पिकांमध्येच उत्तर दडलेले आहे यावर प्राध्यापक स्वामीनाथन यांचा गाढ विश्वास होता असे सांगून प्राध्यापक स्वामीनाथन यांचा शेतीमध्ये दुष्काळ सहनशीलता आणि क्षार सहनशीलता यावर कटाक्ष होता, असे पंतप्रधान म्हणाले. भरड धान्य किंवा श्री अन्न यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत असल्याच्या काळात प्राध्यापक स्वामीनाथन यांनी त्यावर कार्य केले, असे त्यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी प्राध्यापक स्वामीनाथन यांनी खारफुटीच्या अनुवांशिक गुणांचे धानामध्ये रूपांतर करण्याचे सुचवले होते, ज्यामुळे पिके अधिक हवामान-लवचिक बनण्यास मदत होईल, अशी आठवण पंतप्रधानांनी सांगितली. आजच्या काळात जेव्हा हवामान बदलाशी संबंधित कृतींचा अंगीकार करणे हे जागतिक प्राधान्य बनले असताना प्राध्यापक स्वामीनाथन यांचे विचार किती दूरदर्शी होते त्याचा प्रत्यय येतो, असे त्यांनी सांगितले.
जैवविविधता हा जागतिक पातळीवर चर्चेचा मुद्दा असून त्याच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असताना जैव आनंद ही संकल्पना विकसित करणारे प्राध्यापक स्वामीनाथन काळाच्या पुढे विचार करणारे होते हे दिसून येते, असे ते म्हणाले. आजचा मेळावा हा त्याच कल्पनेचा उत्सव आहे असे त्यांनी नमूद केले. जैवविविधतेच्या शक्तीमुळे स्थानिक समुदायांच्या जीवनात परिवर्तनकारी बदल घडू शकतात हे डॉ. स्वामीनाथन यांचे म्हणणे उद्धृत करून, स्थानिक संसाधनांच्या वापराद्वारे लोकांसाठी उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण करता येतात यावर पंतप्रधानांनी भर दिला. डॉ. स्वामीनाथन यांच्यात नवकल्पनांचा अविष्कार तळागाळातील प्रत्यक्ष कृतीत साकारण्याची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता होती. डॉ. स्वामीनाथन यांनी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन शोधांचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी सातत्याने काम केले, डॉ. स्वामीनाथन यांच्या प्रयत्नांचा छोटे शेतकरी, मच्छीमार आणि आदिवासी समुदायांना मोठा फायदा झाला, असे पंतप्रधान म्हणाले.
प्राध्यापक स्वामीनाथन यांच्या वारशाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने एम. एस. स्वामीनाथन अन्न आणि शांतता पुरस्कार सुरु केल्याबद्दल आनंद व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले की अन्नसुरक्षा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विकसनशील राष्ट्रातील व्यक्तींना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाईल. अन्न आणि शांती यांच्यातील नाते हे केवळ तात्विकच नाही तर ते व्यावहारिक देखील आहे, असे ते म्हणाले. उपनिषदांमधील एका श्लोकाचा उल्लेख करून, पंतप्रधानांनी अन्नाचे पावित्र्य अधोरेखित केले, अन्न हे जीवन आहे आणि त्याचा कधीही अनादर किंवा दुर्लक्ष करता कामा नये असे ते म्हणाले. अन्नाचे कोणतेही संकट अपरिहार्यपणे जीवनाच्या संकटाला कारणीभूत ठरते आणि जेव्हा लाखो लोकांचे जीवन धोक्यात येते तेव्हा जागतिक अशांतता अपरिहार्य बनते, असा इशारा देत, पंतप्रधानांनी आजच्या जगात अन्न आणि शांततेसाठी एम. एस. स्वामीनाथन पुरस्काराचे महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधानांनी या पुरस्काराचे पहिले मानकरी नायजेरियाचे प्राध्यापक आडेनले यांचे अभिनंदन केले आणिते एक प्रतिभावान शास्त्रज्ञ असून त्यांचे कार्य या सन्मानाच्या भावनेचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले.
भारत आज दूध, डाळी आणि तागाच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे हे अधोरेखित करुन देशातील कृषिक्षेत्राने सध्या गाठलेली उंची पाहता डॉ एम.एस.स्वामीनाथन यांना नक्कीच अभिमान वाटला असता, असे पंतप्रधान म्हणाले. भारत तांदूळ, गहू, कापूस, फळे आणि भाज्यांच्या उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश आहे, असे त्यांनी सांगितले. भारताने गेल्या वर्षी आपले सर्वोच्च अन्नधान्य उत्पादन केले असे पंतप्रधान म्हणाले. सोयाबीन, मोहरी आणि भुईमूग उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचल्याने भारत तेलबियांमध्येही विक्रम प्रस्थापित करत आहे यावर त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांचे हित हे देशाचे सर्वोच्च प्राधान्य असून देश कधीही शेतकऱ्यांच्या, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी तडजोड करणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, कृषी खर्च कमी करणे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, नीती आयोगाचे डॉक्टर रमेश चंद्र, एम एस स्वामीनाथन प्रतिष्ठानच्या सौम्या स्वामीनाथन आणि इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
