सीटी स्कॅन, एमआरआय चाचण्यांसाठी ‘घाटी’ला ५० टक्के शुल्क जिल्हा नियोजन समिती देणार असल्याचे पालकमंत्र्यांची माहिती
स्मशानभूमी दुरुस्तीसाठी प्रत्येक आमदारांस १ कोटी रुपये निधी देण्याचाही निर्णय
छत्रपती संभाजीनगर, दि.१२: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (घाटी) सीटी स्कॅन, एमआरआय चाचण्यांसाठी रुग्णांना जे शुल्क आकारले जाते त्यातील ५० टक्के शुल्क हे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात येईल. त्यामुळे रुग्णांना केवळ ५० टक्केच शुल्क भरावे लागेल, असे निर्देश पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज दिले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली.या बैठकीस इमाव, अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, विधानपरिषद सदस्य आमदार विक्रम काळे, आमदार राजेश राठोड, आमदार संजय केणेकर, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार प्रशांत बंब, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव, आमदार विलास भुमरे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
८४९ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर
जिल्हा नियोजन समितीत माहिती देण्यात आली की, सन २०२५-२६ मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण करीता ७३५ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजना करीता १०४ कोटी रुपये तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना १० कोटी ४६ लक्ष रुपये असा एकूण ८४९ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. तर ३ कोटी १४ लक्ष रुपये निधी आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना करीता प्राप्त झाला आहे.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, सिद्धार्थ उद्यान प्रवेशद्वार कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला या घटनेची चौकशी करण्यात येईल. दरम्यान मृत महिलांच्या कुटुंबाला आर्थिक मदत शासनाने मंजूर केली आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त वीज अटकाव यंत्रे बसवावीत. जेणेकरुन वीज कोसळून होणाऱ्या दुर्घटनांना थांबविता येईल. त्यासाठीही जिल्हा नियोजन समिती निधी देईल. जायकवाडी प्रकल्पासंदर्भात ‘मेरी’ या संस्थेने दिलेल्या अहवालासंदर्भात सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतील व आपले म्हणणे मांडतील. महावितरणने ट्रानस्फार्मर बसवून देण्याचे काम पूर्ण करावे. शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष द्यावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सीटी स्कॅन व एमआरआय साठी निम्मे शुल्क जिल्हा नियोजन समिती देईल. तसेच जिल्ह्यात दुरावस्था झालेल्या स्मशानभुमीची दुरुस्ती करता यावी यासाठी प्रत्येक आमदारांस त्यांच्या कार्यक्षेत्रात कामे करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जासंदर्भात येत्या सोमवारी बॅंकांची आढावा बैठक घ्यावी. खुलताबाद येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या निर्मितीची योजना तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच त्याठिकाणी अधिकाधिक सौर उर्जेचा वापर करण्याचे नियोजन आहे. तसेच वेरुळ येथील मालोजीराजे गढी येथेही पर्यटकांची गर्दी होत आहे. शहरातील वंदे मातरम सभागृह हे देखभालीसाठी महापालिकेकडे देण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. तसेच प्रत्येक विभागाने आपापल्या कार्यक्षेत्रात वृक्ष लागवड करावी. त्याचे वेळापत्रक तयार करुन लोकप्रतिनिधींना द्यावे, जेणेकरुन त्यांनाही या उपक्रमात सहभागी होता येईल.
शासकीय इमारतींवर ‘सोलार’ – अतुल सावे
इमाव कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, शहरात अनेक ठिकाणी विजेचे ट्रान्सफार्मर, विजेचे खांब हे हटविण्यात आलेले नाहीत. रस्ता रुंदीकरण पूर्ण झालेले असल्याने आता हे खांब, ट्रान्सफार्मर रस्त्यात अडथळे ठरत आहेत. अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. त्या तात्काळ हटवाव्या. सर्व शासकीय इमारतींवर सोलर बसवा. त्याद्वारे वीज निर्मिती करा. दिव्यांगांसाठी राखीव निधीचा योग्य विनियोग करावा.
विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना युरिया योग्य दरात मिळावा. लिंकिंग बाबत कारवाई व्हावी व शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खते मिळावीत. तसेच जायकवाडी धरणाबाबत मेरी या संस्थेने दिलेल्या अहवालाबाबत समितीने शासनाकडे आपले मत व्यक्त करुन हा अहवाल रद्द करावा. आदीवासी बाह्य क्षेत्रातील भुमिहिनांच्या सबलीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेसाठी तरतूद वाढवावी. तसेच पुनर्विनियोजन करतांना वळविण्यात येणारा निधी हा शहरी व ग्रामिण भागातील विकासासाठी समसमान वाटप करावा. विभागीय ग्रंथालयाजवळ मनपाचे कचरा संकलन केंद्र आहे ते तेथून हटविण्यात यावे.
पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या अभिनंदनाचा ठराव
पालकमंत्री यांनी घाटी रुग्णालयातील सीटीस्कॅन आणि एमआरआय तपासण्यांचे दर निम्मे करुन रुग्णालयाला जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याचा निर्णय घेतला, याबद्दल समितीने पालकमंत्र्यांचे अभिनंदन करण्याचा ठराव मांडला. तसेच जिल्ह्यात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी राबवलेले लोकाभिमुख उपक्रमांबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्याचा ठराव मांडण्यात आला. हे ठराव मांडताच उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.
जिल्हा नियोजन समितीसमोर जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमांचे सादरीकरण
जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या सर्व उपक्रमांचे जिल्हा नियोजन समितीसमोर आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सादरीकरण करुन माहिती दिली.
या सादरीकरणात जिल्हाधिकारी स्वामी यांनी फेरफार अदालत, अभ्यागतांसाठी केलेल्या सुविधा, ई- ऑफिस, रस्ते अदालत, शून्य प्रलंबितता, तक्रार पेटी, क्यू आर कोड द्वारे तक्रारी स्विकारणे, जनसंवाद कक्ष, तक्रार निवारण दिवस, उद्योजकांशी चर्चा, शिक्षण क्षेत्रातील दशसुत्री, युवा संवाद, महिला सक्षमीकरण अभियान, जलसमृद्ध गाव अभियान, गाव तेथे वड अभियान, बालहक्क संरक्षणाची पंचसुत्री, गाव तेथे वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांची माहिती दिली. अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविल्याबद्दल समितीने त्यांचे अभिनंदन केले.
