उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला राज्याचा अर्थसंकल्प
मुंबई, दि. १०: राज्याचं नवीन औद्योगिक धोरण, कामगार धोरण, गृहनिर्माण धोरण तसंच आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण लवकरच जाहीर करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. उद्योग, पायाभूत सुविधा, कृषि आणि संलग्न क्षेत्रे, सामाजिक तसंच इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. यात त्यांनी नवीन औद्योगिक, कामगार, गृहनिर्माण, जलप्रवास, आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरणाची घोषणा त्यांनी यावेळी केली.
नव्या औद्योगिक धोरणातून ५ वर्षात ४० लाख कोटींची गुंतवणूक, ५० लाख रोजगारनिर्मितीचं उद्दिष्ट सरकारनं ठेवले आहे. केंद्र सरकारच्या नवीन कामगार संहितेनुसार नवं कामगार धोरण राज्य सरकार तयार करणार आहे. मुंबईत गेटवे इंडियापासून मांडवा आणि एलिफंटा पर्यंतच्या जल प्रवासासाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण सरकार जाहीर करणार आहे. याशिवाय राज्याचे नवे आरोग्य आणि जेष्ठ नागरिक धोरण तसंच गृहनिर्माण धोरण लवकरच सरकार जाहीर करणार आहे.
हवाई वाहतूक, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जल वाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन आणि दळणवळण यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रात येत्या ५ वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा सरकारचा विचार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं. नवी मुंबईत अडीचशे एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर उभारलं जाणार आहे. याशिवाय मुंबई महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था सध्याच्या १४० अब्ज डॉलरवरुन २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर आणि २०४७ पर्यंत दीड ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे.
अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा २०२५ ते २०४७ राज्य सरकार तयार करणार आहे. याअंतर्गत पर्यटन केंद्र, तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळं, गडकिल्ले, राष्ट्रीय उद्यानं, अभयारण्यं, ५ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली वसाहतीतल्या रस्त्यांचे काम केले जाणार आहे. ठाण्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजन सरकारन केलं आहे. याशिवाय ठाण्यात बाळकुम ते गायमुख किनारी मार्ग आणि उत्तन ते विरार सागरी सेतू बांधण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली. येत्या वर्षात मुंबईत ४१ किलोमीटर तर पुण्यात २३ किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार असून येत्या ५ वर्षात राज्यात २३७ किलोमीटरचे मेट्रो मार्ग राज्यात सुरू करण्याचं नियोजन आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पुढच्या महिन्यात तर अमरावतीतल्या बेलोरा विमानतळावरुन महिनाअखेर वाहतूक सुरू होणार आहे, असं त्यांनी आज जाहीर केलं. एसटी महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी सरकार अर्थसहाय्य देणार असून ६ हजार डिझेल बसचे CNG, LNG मध्ये रुपांतर करण्याचं काम सुरू आहे.
व्यक्तिगत वापराच्या सीएनजी आणि एलपीजी वाहनांवरच्या करात १ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला. याशिवाय ३० लाखापेक्षा अधिक किंमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६ टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी त्यांनी प्रस्तावित केली. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर्स आणि एस्कॅव्हेटर्स या प्रकारातील वाहनांना तसंच मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर ७ टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचा प्रस्ताव त्यांनी अर्थसंकल्पात मांडला. विविध गोष्टींसाठी लागणारं मुद्रांक शुल्क शंभर रुपयांवरुन ५०० आणि १ हजार रुपये करण्याचा प्रस्तावही त्यांनी सादर केला आहे.
बी बियाणे, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते ही नवे योजना अर्थमंत्र्यांनी आज जाहीर केली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन पहिल्या टप्प्यात राज्यातल्या ५० हजार शेतकऱ्यांच्या १ लाख एकर क्षेत्राला लाभ देण्याचा निर्णय त्यांनी आज जाहीर केला. कोकणातल्या उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ अर्थमंत्र्यांनी आज जाहीर केली. या अंतर्गत सर्व घरकुलांच्या छतावर सौर उर्जा संच बसविण्यात येणार आहेत. १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या सुमारे दीड कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर उर्जा संच खरेदीसाठी सरकार अनुदान देणार आहे. या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील सुमारे ७० टक्के वीज ग्राहकांचे वीजबील टप्प्या टप्प्याने शून्यावर येईल, असं ते म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालये, आरोग्य संस्थांसह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर विद्युत यंत्रणा लावण्याची घोषणा त्यांनी आज केली.
येत्या आर्थिक वर्षात लाडकी बहीण योजनेसाठी ३६ हजार कोटींचा निधी राखून ठेवला असल्याचं अर्थमंत्री म्हणाले. राज्यातल्या पावणे २ कोटी असंघटीत कामगार आणि शेतमजुरांसाठी सामाजिक सुरक्षा योजना सरकार राबवणार आहे. अनुसूचित जाती उपयोजनेच्या तरतुदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४२ टक्के, आदिवासी उपयोजनेच्या तरतुदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४० टक्के एवढी भरीव वाढ केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्र्यात, छत्रपती संभाजी महाराजांचे संगमेश्वरमध्ये आणि मराठ्यांचे शौर्याचे प्रतीक म्हणून पानिपतमध्ये, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे साताऱ्यातल्या नायगावमध्ये, माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे मुंबईत स्मारक उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी आज केली. रिद्धपूरमधल्या मराठी भाषा विद्यापीठात अभिजात मराठी भाषेच्या संशोधन आणि अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र आणि अनुवाद अकादमी स्थापन केली जाणार आहे. याशिवाय मराठी भाषेच्या संशोधनासाठी पुरस्काराची घोषणा त्यांनी केली २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण तसंच नमामि गोदावरी अभियानाची घोषणा त्यांनी आज केली.
उद्योग, पायाभूत सुविधा, कृषि आणि संलग्न क्षेत्रे, सामाजिक तसंच इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. त्यांचा हा ११ वा अर्थसंकल्प होता. राज्य सरकार लवकरच नवे औद्योगिक, कामगार, गृहनिर्माण, जलप्रवास, आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करणार असल्याची घोषणा यावेळी केली.
नव्या औद्योगिक धोरणातून ५ वर्षात ४० लाख कोटींची गुंतवणूक, ५० लाख रोजगारनिर्मितीचं उद्दिष्ट सरकारनं ठेवले आहे. केंद्र सरकारच्या नवीन कामगार संहितेनुसार नवे कामगार धोरण राज्य सरकार तयार करणार आहे. सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट येत्या ५ वर्षात साध्य करण्यासाठी गृहनिर्माण धोरण लवकरच सरकार जाहीर करणार आहे. प्रत्येकाला ५ किलोमीटरच्या परिघात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार विशेष कार्यक्रम हाती घेणार आहे.
विमान चालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जल वाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन आणि दळणवळण यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रात येत्या ५ वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा सरकारचा विचार असल्याचं अजित पवार यांनी आज जाहीर केलं. नवी मुंबईत अडीचशे एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर उभारलं जाणार आहे. नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार, मुंबईत मरोळमध्ये आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार, गडचिरोलीतल्या आरमोरीत रेशीम कोष खरेदी विक्री बाजार उभारली जाणार आहे. याशिवाय मुंबई महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था सध्याच्या १४० अब्ज डॉलरवरुन २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर आणि २०४७ पर्यंत दीड ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा २०२५ ते २०४७ सरकार तयार करणार आहे. एसटी महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी सरकार अर्थसहाय्य देणार असून ६ हजार डिझेल बसचे CNG, LNG मध्ये रुपांतर करण्याचं काम सुरू आहे, असं ते म्हणाले.
Source – AIR
