पुणे इमारत दुर्घटना: २००-३०० रुपये दिवसाला कमावणाऱ्या मजुरांच्या जीवाची काहीच किंमत नाही का?
पुणे: सारं पुणे गाढ झोपेत असताना कोंढवा भागात मध्यरात्री दीड वाजता एका सोसायटीच्या कंपाऊंडची भिंत कोसळून १५ बांधकाम मजुरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या ठिकाणी NDRF व अग्निशमन दलाने तात्काळ मदतकार्य सूरु करून ३ कामगारांना ढिगाऱ्याखालून काढले. आणखीही काही लोकं ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सदर घटनेवर भाष्य करताना म्हटले आहे की ज्या इमारतीची भिंत कोसळली त्याचे बिल्डर व कंत्राटदार या दुर्घटनेला मुख्यत्वे जबाबदार आहेत. बांधकाम मजुरांच्या सुरक्षेकडे अक्षम्य कानाडोळा झाल्याचेही त्यांनी नमूद केले. या मजुरांना कंपाऊंड च्या बाजूलाच राहण्यासाठी निवारा देण्यात आला होता. ज्यामुळे भिंत कोसळली तेव्हा त्यांना स्वतःचे प्राण वाचवायलाही वेळ मिळाला नाही.
आता प्रश्न असा उपस्थित होतो की दिवसाला २००-३०० रुपये कमावणाऱ्या या बांधकाम मजुरांच्या जीवाची काहीच किंमत नाही का? ज्या मजुरांच्या जीवावर अख्खी इमारत उभी राहते त्यांच्या सुरक्षेची काळजी का घेतली जात नाही. या अशा विकासकांवर व कंत्रातदारांवर तसेच सुरक्षेची कुठलीही मानकं न तपासता यांना बांधकामाची परवानगी देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी.
