विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविकास आघाडीवर दणदणीत विजय
मुंबई, दि. २३: २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली आणि साधारण पुढच्या काही तासातच निकालाचा कल स्पष्ट झाला. भाजप, शिवसेना(शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीने घवघवीत यश प्राप्त करत महाविकास आघाडीला चितपट केलं असून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना मिळून ६० जागांचा आकडा पार करता आलेला नाही. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजप १३३, शिवसेना शिंदे गट ५७ तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ४१ जागांवर विजयी झाला आहे. एकूण २३४ जागांवर महायुतीने विजय मिळवला असून महाविकास आघाडीला फक्त ४७ जागांचा आकडा गाठता आला आहे. यात शिवसेना २०, काँग्रेस १५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष १० व इतर पक्षांना २ जागी विजय मिळाला आहे.
आज जाहीर झालेला निकाल हा महाविकास आघाडीला अनपेक्षित होता असेच दिसते आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, धीरज देशमुख, यशोमती ठाकूर आदींचा धक्कादायक पराभव झालेला पाहायला मिळाला. याच सोबत एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचाही पराभव झाला आहे.
मुंबईतील ज्या लढतींकडे सबंध राज्याचे लक्ष लागून राहिले होते त्या माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले तर मूळ लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात पाहायला मिळाली. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांच्यावर मात देत विजयश्री खेचून आणला. अशाच प्रकारे वरळीतील चुरशीच्या लढतीत उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या मिलिंद देवरा यांचा पराभव केला.
महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसला तरी येत्या २५ तारखेला वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा पार पडला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सर्वात जास्त जागी विजयी झालेला भारतीय जनता पक्षाचा नेता मुख्यमंत्रीपदी बसेल अशी अटकळ आहे.