“वाढवण येथे विमानतळ बांधण्याच्या मागणीचा विचार आचारसंहिता संपल्यानंतर करु” – पंतप्रधान नरेंद्र मोदी
धुळे, दि. ८: राज्यात निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर तापला आहे. सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभा ठिकठिकाणी होत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी तर्फे आपापल्या कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडतानाच विरोधकांवर आरोप, टीका करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भाजप उमेदवारांसाठी धुळ्यात जाहीर सभा घेतली. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम केवळ महायुतीचं सरकारच करु शकतं, असं त्यांनी सांगितलं. महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, आदिवासींचे हक्क इत्यादी क्षेत्रात युती सरकारने राबवलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला.
महाविकास आघाडीने अनेक विकासप्रकल्पांच्या मार्गात खोडा घातला असा आरोप त्यांनी केला. तसंच मविआमधे आपसात भांडणं असल्याबद्दल त्यांनी टीका केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या सरकारने मिळवून दिल्याची आठवण करुन देत त्यांनी डबल इंजिन सरकार निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं. वाढवण इथं विमानतळ बांधण्याच्या मागणीचा विचार आचारसंहिता संपल्यानंतर करु असं आश्वासन त्यांनी दिलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही भाषण यावेळी झालं. शेतकऱ्यांना पाणीपुरवठा, औद्योगिक विकास, रस्ते आणि पायाभूत सुविधा विकास अशी आश्वासनं त्यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातली ही त्यांची पहिलीच प्रचारसभा होती. त्यानंतर नाशिकमधे त्यांची सभा होत आहे. या सभेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डबल इंजिन सरकारसाठी महायुतीला मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं.
Source – AIR
