केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कर हस्तांतरण
नवी दिल्ली, दि. ११ : महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटी रुपये कर हस्तांतरण आज जारी करण्यात आले. या निधीच्या रक्कमेत आगामी सणासुदीच्या काळात भांडवल खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याच्या रक्कमेचाही समावेश आहे. उर्वरित निधी रक्कम ही राज्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्यासाठी आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना १,७८,१७३ कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ऑक्टोबर, २०२४ मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त ८९,०८६.५० कोटी रुपयांच्या एका अग्रीम हप्त्याचा समावेश आहे. या हस्तांतरणाचा उद्देश आगामी सणासुदीच्या काळात राज्यांना भांडवली खर्चात मदत करणे आणि त्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्याचा आहे.
महाराष्ट्राला या हस्तांतरणातून ११,२५५ कोटी रुपये मिळाले आहेत. हा निधी राज्याच्या महत्त्वाच्या योजना आणि उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर सहाय्यभूत ठरणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांनाही मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहे. या आकड्यांकडे पाहून महाराष्ट्रासोबत केंद्र सरकारकडून दुजाभाव केला जातोय हा राज्यातील विरोधीपक्षांच्या दावात तथ्य असल्याचे स्पष्टपणे जाणवते. यात कमी जीएसटी भरणाऱ्या उत्तर प्रदेशाला सर्वाधिक ३१,९६२ कोटी रुपये, तर बिहारला १७,९२१ कोटी रुपये आणि पश्चिम बंगाल राज्याला १३,४०४ कोटी रुपये मिळाले आहेत. म्हणजेच उत्तर प्रदेश ला महाराष्ट्रापेक्षा तिप्पट परतावा मिळाला आहे.
