पनवेल महानगरपालिकेकडून ठोस उपाययोजना होणं अपेक्षित
पनवेल, दि. ०९: गणेशोत्सवानिमित्त सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. पनवेल शहरातही दोन दिवसांपूर्वी घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचं मूर्तिशाळांमधून वाजतगाजत आगमन झालं. परंतु, गणरायाच्या आगमनाच्या वाटेवर मोठा खोडा टाकला तो जागोजागी पडलेल्या खड्ड्यांनी. यावेळी सामान्य माणसाप्रमाणे गणरायालाही या खड्ड्यांमधून आपली वाट धुंडाळावी लागली. पालिका हद्दीतील निकृष्ट दर्जाचे रस्ते(कॉंक्रिटसह) व त्यात भर म्हणून पडलेले उत्कृष्ट दर्जाचे खड्डे, यामुळे पनवेलकरांप्रमाणे लाडक्या बाप्पानेही पनवेल महानगरपालिका व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींस शाप नक्कीच दिला असावा.
पनवेल विभागाबाबत बोलायचं झाल्यास कोळीवाडा ते वडघर पुलापर्यंत तर टपाल नका ते रोहिदास वाडा दरम्यान रस्त्याची वाताहत झालेली आहे. अशाच प्रकारे नव्याने बांधलेल्या कॉंक्रिट च्या रस्त्यावरही काही ठिकाणी तडे तर काही जागी लेव्हल वर खाली झालेली पाहायला मिळतेय. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरील खड्डे छोटे असले तरी दुचाकीस्वारांना गाडी चालवताना बऱ्याच कसरती कराव्या लागत आहेत. यात अपघात होण्याचा धोका संभवतो. काही ठिकाणी गटारांची झाकणं बसवतानाही कंत्राटदारांनी हलगर्जीपणा केल्यामुळे रस्त्याला म्हणावी तशी लेव्हल लाभलेली नाही. पनवेल ते नवीन पनवेल विभागास जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच मोठाले खड्डे पडल्यामुळे गाड्यांची तर विल्हेवाट लागतेच आहे परंतु, या ठिकाणी सिग्नल पार करताना किंवा तो पार केल्यावर गाड्यांची गती कमी होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होतेय. बरं, या रस्त्याची हि समस्या याच पावसातली आहे असं नाही. हे वर्षानुवर्षांचं रडगाणं आहे. या समस्येचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्याची इच्छाशक्ती प्रशासनात का येत नाही हा एक सवाल सर्वांना पडला आहे. बाकी या पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत न बोललेलंच बरं.

नवीन पनवेल बाबत बोलायचं झालं तर खांदा कॉलनीचा उड्डाणपूल सुरू होण्यापूर्वी सेक्टर – ८ येथे अगदी निर्लज्जपणे पेव्हरब्लॉक टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आलेली आहे. याही ठिकाणी दर वर्षी रस्त्याचा हाच हिस्सा नेमका खराब होतो हे विशेष. याच प्रमाणे गुरुद्वारा समोरील मार्ग ते पोस्ट ऑफिस दरम्यानचा रस्ताही अनेक जागी खराब झाला आहे. सेक्टर – ३ ,४ ,५ मध्येही अंतर्गत रस्ते खराब झाले असून काही ठिकाणी महानगर गॅस कडून खड्डे योग्यरीत्या न बुजवल्यामुळेही नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. हेच हाल कामोठे, कळंबोली विभागातील अंतर्गत रस्त्यांचे असून त्यावर वर्षानुवर्षे फक्त तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत आहे.
मुळात गणरायाचं आगमन होण्यापूर्वी रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. परंतु, तसं झालेलं दिसत नाही. ज्या ठिकाणी तात्पुरतं काम केल्याचा दावा पालिका करतेय त्यातल्या बऱ्याच ठिकाणी फक्त खाडी टाकून रोल रोलर फिरवला गेलाय. रस्ते एकाच ठिकाणी दर पावसात खराब होत असतील तर प्रशासनाने वन टाईम प्लानिंग करणं गरजेचं आहे. पनवेल महानगर पालिका हद्दीतील अशा सर्व रस्त्यांचं ऑडिट करून त्या ठिकाणी या मार्गांचं आयुष्य वाढवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणं अपेक्षित आहे. यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या लाडक्या कंत्राटदारांच्या पोटावर पाय जरूर येईल पण असं केल्यामुळे किमान पनवेलकरांच्या मणक्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल यात तिळमात्र शंका नाही.
