महाराष्ट्रासह ८ राज्यांत दहशतवादी हल्ल्याचा संशय; पोलिसांकडून सर्वत्र अॅलर्ट घोषित
श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रासह देशातील ८ राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भारताच्या किनारी राज्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. समुद्रमार्गे दहशतवादी या राज्यांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेता ही खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रासह ८ राज्यांना पत्र लिहून दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची सूचना देत अॅलर्ट दिला आहे.
कर्नाटक पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना एका व्यक्तीने फोनवरुन सांगितले की, महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर ६ राज्यांमध्ये हल्ला घडवून आणण्याचा कट रचला जात आहे. या माहितीनंतर कर्नाटकचे पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षक यांनी महाराष्ट्र, गोवा, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, पुदुच्चेरी या राज्यांच्या पोलीस प्रमुखांना पत्र लिहून अॅलर्ट राहण्यास सांगितले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, ज्या व्यक्तीने कर्नाटक पोलिसांना फोन केला त्याने स्वतः एक ट्रक ड्रायव्हर असल्याचे सांगितले आहे. स्वामी सुंदर मुर्ती असे स्वतःचे नाव सांगताना शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता बंगळुरू शहर पोलिसांच्या कन्ट्रोल रुमला त्याने फोन केला होता. यामध्ये त्याने सांगितले होते की, देशातील आठ राज्यांमध्ये दहशतवादी स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत आहेत.
रविवारी श्रीलंकेत ईस्टर दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ५०० जण जखमी झाले आहेत. काल, शुक्रवारी श्रीलंकन पोलिस आणि सुरक्षा दलाने केलेल्या छापेमारीदरम्यान एका आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला स्फोटाने उडवून दिले.
