…अशा नेत्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार काढून घ्या : उद्धव ठाकरे
ठाणे : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले, तर ३७० कलम रद्द करू, असे आम्ही सांगत आहोत, तर काँग्रेस आघाडीचे नेते राहुल गांधी हे ३७० कलम रद्द करणार नाही, असे सांगत आहेत. देशाच्या सुरक्षेशी छेडछाड करणाऱ्या अशा नेत्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार काढून घ्या. हीच खरी निवडणूक आचारसंहिता असेल, अशी आग्रही मागणी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली.
महायुतीचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन मंगळवारी सायंकाळी करण्यात आले होते.
कल्याण, ठाण्यात रेल्वे फेऱ्या वाढल्या, जलवाहतूक आली, मेट्रो येणार आहे, रस्ते रुंद होत आहेत, आरोग्यासाठी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारली जात आहेत. आपण हवेत वार्ता न करता जे बोलतो ते करून दाखवतो, आपले केलेल्या कामाचे पुस्तक आहे. विरोधकांना फक्त ते वाचता आले पाहिजेत अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
५०० चौरस फुटांपर्यंतचा मालमत्ता कर रद्द करणारच हे वचन शिवसेनेने दिले आहे. मुंबईत तशी घोषणाच महापालिकेने केली आहे. ठाणेकरांचासुद्धा ५०० चौरस फुटांपर्यंतचा मालमत्ता कर रद्द करणारच अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. विरोधक यावर जाब विचारतात, पण तुम्हाला वाचता येत असेल तर आमच्या अहवालाची पुस्तके वाचा. दिलेली वचने आम्ही पूर्ण करतोच असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
पराभवाच्या भीतीने माढ्यातून सेनापतीनेच माघार घेतली. त्यामुळे त्यांना सैनिकांच्या शौर्यावर टीका करताना लाज कशी वाटत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना केला. सैन्याच्या शौर्यावर टीका करणारी हीच मंडळी इशरत जहाँच्या घरी सांत्वनाला गेली होती. अशा लोकांनी आम्हाला शौर्याचे धडे शिकवू नयेत, असेही ते म्हणाले.
शरद पवार यांच्या काळात चारा छावणी आणि शेणाचा घोटाळा झाला. पवारांचा शेतकऱ्यांसोबत फोटो आल्याने शेतकरीच चिंताग्रस्त झाले आहेत. आता पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यांवर ते शंका उपस्थित करीत आहेत. देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे ऋण आपण फेडू शकणार नाही त्यांच्या शौर्यावरही शंका आहे. राहुल गांधी तर देशद्रोहाचे कलमच रद्द करायला निघाला आहे. मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारतो की, हा देश जसा आमचा आहे तसा तुमचाही आहे ना? मग तुमच्या पक्षप्रमुखांना देशहित आणि देशविघातक का कळत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मागील साडेचार वर्षांत आमच्यात काही मतभेद होते, परंतु आता आम्ही एकत्र आलो आहोत. मी जे काही मुद्दे मांडले होते, ज्या काही मागण्या केल्या होत्या, त्या मान्य झाल्यानेच ही युती झाल्याचेही त्यांनी नमूद केले. तुम्ही युतीबरोबर आहात की नाही, असा सवाल करून उपस्थितांना प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. उपस्थित शिवसैनिकांनी त्याला होकारार्थी प्रतिसाद दिला.
श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे यांना मतदान म्हणजे मोदींना मतदान असे ठामपणे सांगणारा शिवसेना-भाजप हा एकमेव पक्ष आहे. विरोधकांना मोदी आणि हिंदुत्ववादी संघटना नकोत मग कोण हवे आहेत असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
