खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत उकळली तब्बल ९४ लाख रुपयांची खंडणी
पुणे, दि.३: गत वर्षी याच काळात मुंबईत घडलेल्या अंटालिय स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणामुळे देशभर मोठी खळबळ उडाली होती. त्यामागोमाग उघड झालेल्या ‘१०० कोटी’ रुपयांच्या वसूली प्रकरणामुळे उठलेलं वादळ तर अद्यपही शमलेलं नाही. या सार्या घटनाक्रमात देशात सर्वात जास्त बदनामी झाली ती महाराष्ट्र पोलिसांची आणि त्याचा केंद्र बिंदू होता वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे, जो सध्या खुनासह अनेक गंभीर स्वरूपाच्या आरोपांखाली ‘एनआयए’ च्या कोठडीत आहे. अशाच प्रकारच्या वर्दीतल्या एका गुन्हेगाराचे कारनामे आता समोर येत आहेत. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कार्यरत असलेल्या व सध्या निलंबित असलेल्या पोलिस उपनिरीक्षक संतोष केशव सोनवणे PSI Santosh Keshav Sonavane याने माझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत आमच्याकडून ९४ लाख रुपये खंडणी उकळल्याबाबतची तक्रार कोथरूड येथे वास्तव्यास असलेल्या रश्मी दिनेश समुद्र(नाव बदललेले आहे) यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाकडे केली होती.
२०१८ सालच्या या प्रकरणात पुणे पोलिसांकडून संतोष सोनवणे वर अद्याप अटकेची कारवाई योग्य न्याय होत नसल्यामुळे मुख्य तक्रारदार असलेल्या रश्मी समुद्र(नाव बदललेले आहे) यांनी महाराष्ट्र वार्ता च्या आपली समस्या टीम ला पाठवलेल्या सविस्तर तपशिलात पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे वर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यातला सारा घटनाक्रम एखाद्या फिल्मी कथेपेक्षा काकणभर अधिकच रंजक आहे. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे दिनेश समुद्र हे २००६ ते ३ जुलै २०१५ पर्यंत पलाश हेल्थकेयर सिस्टिम्स Palash Healthcare Systems या कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) तसेच नियुक्त संचालक(Director) म्हणून कार्यरत होते. पलाश कंपनीचे मूळ मालक नरेंद्र बराटे Narendra Barate व त्यांची पत्नी भारती बराटे Bharti Barate यांनी दिनेश यांना पलाश कंपनी चालवायचे पूर्ण अधिकार दिले असले तरी कंपनीच्या सर्व आर्थिक बाबी व कंट्रोल हा स्वत: व बराटे यांच्याकडेच कायम होता. दिनेश यांनी पलाश कंपनी सोडल्यावरदेखील नरेंद्र बराटे व दिनेश यांचे संबंध चांगले होते परंतु, अचानक २७ एप्रिल २०१८ रोजी पुण्यातील एका वृत्तपत्राच्या माध्यमातून पलाश कंपनीने दिनेश यांच्या वर १२.५० लाख रुपयांच्या अपहाराची केस केल्याचे रश्मी समुद्र(नाव बदललेले आहे) यांना समजले. त्यावेळी दिनेश पुण्यात नव्हते, यावेळी रश्मी यांनी या वृत्तपत्राच्या कार्यालयात जात संबंधित बातमीबद्दल सांगितल्यावर त्यांच्या ओळखीतून त्यांना एका महिला वकीलाचे नाव, नंबर व पत्ता मिळाला. रश्मी व त्यांचा मुलगा रोहन तातडीने या वकिलीण बाईंच्या फर्गुयसन रोडवरील ऑफिसमध्ये भेटीला गेले असता त्यांच्याशी बोलत असताना रश्मी समुद्र यांच्या फोनवर अचानक पीएसआय संतोष सोनवणे याचा दिनेश समुद्र यांची चौकशी करणारा फोन आला. त्यावेळी या वकिलीण बाईंनी अशा छोट्या केसेस पोलिसांच्या मदतीने बाहेरच मिटवायच्या असतात असा ‘मोलाचा’ सल्ला दिला.

यानंतर रश्मी समुद्र घरी पोचल्यावर त्यांना थोड्या वेळातच वकिलीण बाईंचा फोन आला व त्यांनी सांगितलं की पीएसआय सोनवणे सगळं मॅनेज करण्यास तयार आहेत, आणि जर पीएसआय सोनवणे याला भेटायचं असेल तर आधी ९ लाख रुपये त्याला द्यावे लागतील. या सार्यामुळे बावरलेल्या रश्मी यांनी ९ लाख रुपयांची सोय करून त्यातील ६.५ लाख रूपयांची रक्कम वकिलीण बाईंच्या बँके खात्यात ट्रान्सफर केली व उरलेले २.५ लाख रुपये त्यांना रोकड स्वरुपात २९ एप्रिल २०१८ रोजी ऑफिसला समक्ष नेऊन दिले. तेव्हा हे प्रकरण एवढ्यातच संपेल असं समुद्र परिवाराला वाटलं. परंतू, पुढचा खेळ तर आणखीच धक्कादायक होता. दिनांक ३० एप्रिल २०१८ रोजी दिनेश समुद्र पुण्यात परत आल्यावर पीएसआय सोनवणे ने या वकिलीण बाईंच्या कार्यालयातच दिनेश ना भेटायला बोलावलं. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पीएसआय संतोष सोनवणे सोबत वकिलीण बाई व एक महिला पत्रकार अशा तिघांनीही दिनेश वर प्रचंड दबाव टाकला आणि त्यांना ही केस पीएसआय सोनवणे कसलेही पुरावे जोडून ४-५ कोटींची करून पक्के अडकवतील असं सांगितलं. त्यामुळे या सार्यातून वाचायचं असेल तर मला ५० पेटी – म्हणजे ५० लाख रुपये दे असं पीएसआय संतोष सोनवणे याने यावेळी सांगितलं. त्या बदल्यात पीएसआय सोनवणे कलम १६९ च्या केस मधून पूर्णत: बाहेर काढतील असा तिघांनीही दिनेश ना शब्द दिला. १५ दिवसांच्या आत संतोष सोनवणेला ही रक्कम हवी होती. कोणत्याही वरिष्ठ अधिकार्याकडे वा इतर कोणाकडेही न जायची वा इतर कसलेही प्रयत्न न करण्याची धमकी पीएसआय सोनवणे याने दिनेश समुद्र यांना दिली होती असे रश्मी समुद्र(नाव बदललेले आहे) यांचं म्हणणं आहे.

ठरल्यानुसार हे सारे पैसे गोळा करण्यासाठी त्यांनी नवीन कंपनीचे शेअर्स विकून, मित्रांकडून मदत घेऊन पैसे गोळा केले(पुरावे उपलब्ध आहेत) व ११ मे २०१८ रोजी स्वतः रश्मी समुद्र व त्यांचा मुलगा रोहन यांनी ४६ लाख रुपये पोलिस उपनिरीक्षक सोनवणे याला दिल्याचे त्या म्हणाल्या. त्या दिवशी बँकेतून ४६ लाख रुपये एवढीच रक्कम निघू शकल्यामुळे उरलेले पैसे सोमवार १४ मे २०१८ रोजी मला मिळाले पाहिजेत असे पीएसआय सोनवणे याने त्यांना दरडावले असेही त्या पुढे म्हणाल्या. अशाच प्रकारे कधी पत्रकार बाईंना पैसे द्यायचे आहेत तर कधी केस संबंधीच्या कामाचे कारण सांगून पीएसआय संतोष सोनवणे याने पुढच्या ५-६ दिवसांतच आणखी ९ लाख रुपये उकळत एकूण ६४ लाख रुपयांची खंडणी तोपर्यंत वसूल केली होती असे अर्चना यांनी नमूद केले. बरं हे पैसे दिल्यानंतर, पीएसआय सोनवणे याने शब्द दिल्याप्रमाणे, १६९ करून द्यायचा विषय देखील काढला नाहीच, उलट दिनेशना २२ मे २०१८ रोजी अटक केली. परंतु अटकेच्या दुसर्या दिवशी कोर्टाने दिनेशचा जामीन मंजूर केला आणि या नंतर पीएसआय सोनवणे याने समुद्र परिवाराला फार मोठ्या संकटातून वाचवले असल्याचे भासवत आमच्या भोळेपणाचा फायदा उठवला असे रश्मी समुद्र म्हणल्या. पुढे त्या म्हणाल्या की, “मध्ये २-३ आठवडे गेले आणि पीएसआय संतोष सोनवणे याने त्यांना भेटून सांगितले की दिनेश ची चार्जशीट लवकर टाकायची आहे त्यामुळे जुरीला २५ लाख रुपये द्यावे लागतील, नाही दिले तर सगळ्याबाजुने कशा अडचणी येतील याची भीती दाखवली.”

यानंतर समुद्र यांनी पुन्हा पैसे गोळा केले व २५ जून २०१८ रोजी पीएसआय सोनवणे याने पाठवलेल्या बुलेट वरून आलेल्या माणसाकडे शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्र. ४ पाशी बॅगमधून सुपूर्द केले. अशा पद्धतीने पोलिस उपनिरीक्षक संतोष केशव सोनवणे याने आमच्या भित्रेपणाचा व कायदयाबद्दलच्या अज्ञानाचा फायदा उचलत आमच्याकडून तब्बल ९४ लाख रुपये एवढी खंडणी वजा लाच उकळली असे रश्मी समुद्र म्हणाल्या.
मुळात या प्रकरणात कलम १६९ ची भीती दाखवली गेली जी अनाठायी होती कारण दिनेश समुद्र यांच्यावर अखेर कारवाई वेगळ्याच कलामाखाली झाली होती. यात आपली फसवणूक झाल्याचे जेव्हा लक्षात आले तेव्हा पुणे पोलिसांकडून न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ज्या माहिती अधिकार कार्यकर्त्याची मदत घेतली त्यानेही उलट पीएसआय सोनवणे व खुद्द समुद्र परिवाराकडेच पैशांची मागणी केली. ज्या संदर्भात लेखी तक्रार आल्यावर पुणे पोलिसांनी त्याच्यावर तात्काळ अटकेची कारवाईही केली. परंतू, आज पुणे पोलिस आयुक्तालयाकडे तक्रार करून जवळपास एक वर्ष उलटलं, अद्याप सोनवणे वर निलंबना व्यतिरिक्त अटक, बडतर्फी व संपत्ती जप्तीसारखी कोणतीच कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत विनाविलंब चौकशीचे आदेश दिले. परंतू, त्यांची कनिष्ठ अधिकारी मंडळी संतोष सोनवणेवर कारवाई करण्यासाठी नेमक्या कोणत्या शुभ(अशुभ) मुहूर्ताची वाट पाहत आहेत हा मोठा सवाल आहे. या प्रकरणी निलंबित पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे Santosh Sonavane याची अद्यापही खात्यांतर्गत चौकशी चालू असून, त्याच्या आणखी काही भानगडी असतील तर त्याचाही तपास होणे आता क्रमप्राप्त आहे.

मागील काही काळापासून पुणे पोलिसांतील वरिष्ठ-कनिष्ठ अधिकारी-कर्मचारी कधी ‘फुकट बिर्याणी’ प्रकरणामुळे तर कधी अशा खंडणीखोरीच्या प्रकरणांमुळे बदनाम झालेले आहेत. उपनिरीक्षक संतोष सोनवणेला पोलिस खात्यातील कोणता अधिकारी पाठीशी घालतोय याचा उलगडा येत्या काही दिवसांत होईलच. तूर्तास पुणे पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे हे संतोष सोनवणे वर अटक व बडतर्फी ची तात्काळ कारवाई करतात का याकडे सार्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पुणे शहरात चालू असलेल्या अवैध धंदयांबाबत पोलीस सहआयुक्त हे अधिकाऱ्यांना वेळोवेळी धारेवर घेत असतात मग संतोष सोनवणे बाबत कारवाई करण्यास विलंब का होतोय? त्यांच्यावर कोणता राजकीय दबाव आहे का? याची उकल होणेही गरजेचे आहे. पुणेवासीयांना अशा ‘वाझें’पासून वाचवण्याची व पुणे पोलिसांची डागाळलेली प्रतिमा सुधरवण्याची नैतिक जबाबदारी पुणे जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील पार पाडतात का हे पाहणे आताच्या घडीला गरजेचे आहे.
Photo Credit – Pune Police Twitter/ Santosh Sonavane FB Wall
(Repeat Article)
अनधिकृत बांधकाम, विकासकाकडून फसवणूक, सरकारी दिरंगाई व आर्थिक घोटाळे संदर्भातील आपल्या काही तक्रारी असतील तर महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम च्या ‘आपली समस्या’ टीम ला आपण 88503 03463 वर व्हाट्सअप्प आणि news@maharashtravarta.com वर ईमेल द्वारे पुराव्यानिशी माहिती देऊ शकता.
महाराष्ट्र वार्ता ने पोलखोल केलेली राज्यातील इतर काही महत्वाची प्रकरणे वाचा
घोटाळेबाज रुचिता जयपुरियार आणि गॅंगकडून लोकांना कोट्यावधींचा चुना; वाचा संपूर्ण बातमी
दिनेश समुद्र, पीएसआय संतोष सोनवणे, Manisha Dharne, मनीषा धारणे, Sachin Waze, PSI Santosh Keshav Sonavane, Santosh Sonawane PSI, Police Sub Inspector Santosh Keshav Sonawane, PSI Santosh Sonavane, Palash Healthcare Systems, Maharashtra Varta, Maharashtra Warta, पुणे पोलिस, संतोष सोनवणे पोलिस, पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे, Santosh Sonavane corrupt, Santosh Sonawane PSI, PSI Santosh Sonawane, Police Sub inspector Santosh Sonawane, Maharashtra Varta, Investigative Journalist, Pune news, Pune Crime News, Pune Crime, Pune Crime News
