उरण येथील हनुमान कोळीवाडा गावच्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूस JNPT प्रशासनास धरले जबाबदार
मागण्या मान्य न झाल्यास समुद्रात चॅनेल बंद आंदोलन
उरण, दि. २३(विठ्ठल ममताबादे): JNPT च्या भ्रष्ट कारभार व हलगर्जीपणामुळे नोकरी न मिळाल्याने मासेमारी करून पोट भरणाऱ्या हनुमान कोळीवाडा या गावातील जेष्ठ नागरिक कृष्णा बिरशा कोळी यांचा दि. २२ जून रोजी पहाटे मासेमारी करताना समुद्रात पडून मृत्यू झाला. कोळी यांच्या मृत्यूला JNPT प्रशासन जबाबदार आल्याचा मयत कोळी यांच्या नातेवाईकांनी केला आहे. उपजीविकेचे कोणतेच साधन उपलब्ध नसलेल्या उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाड्याचा पुनर्वसनाचा प्रश्न गावातील रहिवाशी असलेले कृष्णा कोळी यांच्या मृत्यूने पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.
JNPT प्रशासनाने हनुमान कोळीवाडा गावाला गेली ३६ वर्षे संक्रमण शिबिरात (Transit Camp)मध्ये ठेवून गुरे ढोरे जसे गोठ्यात कोंबून ठेवतात तसे आजपर्यंत पुनर्वसनाच्या नावाखाली जेएनपीटी प्रशासनाने उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाड्यातील ग्रामस्थांना कोंबून ठेवले आहे. जेएनपीटी प्रशासनास हनुमान कोळीवाडा गावातील ग्रामस्थांनी आपल्या शेकडो एकर जमिनी दिल्या. त्या बदल्यात प्रशासनाने ग्रामस्थांच्या, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे व नोकरीत सामावून घेण्याची आश्वासन दिले होते. मात्र प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झालेच नाही. शिवाय प्रकल्पबाधित नागरिक, ग्रामस्थ हे नोकरी तसेच विविध नागरी सेवा-सुविधांपासून वंचित राहिले आहेत. ३६ वर्षे उलटूनही हा प्रश्न असाच प्रलंबित आहे. JNPT प्रकल्प सुरु होऊन ३६ वर्षे झाली. प्रकल्प सुरु होण्याअगोदर या प्रकल्पाने उरण तालुक्यातील नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा हि दोन गावे पूर्ण विस्थापित करतेवेळी नवीन शेवा गावाला ३५ हेक्टर जागा आणि हनुमान कोळीवाडा गावाला १७ हेक्टर जागा देण्याचे मान्य केले होते. तसेच टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेकडून दोन्ही गावांचे सर्वेक्षण, पुनर्वसन झाले. तसेच प्रत्येक कुटुंबाला घरटी एक प्रमाणे नोकरी दिली असल्याचा रिपोर्ट शासनास दिला आहे. परंतु प्रत्यक्षात शेवा गावाला ३५ हेक्टर जागा न देता १७ हेक्टर जागा दिली. तसेच हनुमान कोळीवाडा गावाला १७ हेक्टर जागा देण्याऐवजी २ हेक्टर जागा देऊन पुनर्वसन केले. म्हणजेच JNPT ने या दोन्ही गावांना ३६ वर्षे संक्रमण शिबिरात (Transit Camp)मध्ये ठेवून मोठी फसवणूक केली आहे. संपूर्ण हनुमान कोळीवाडा गावातील घरांना वाळवी लागली आहे. वाळवी मुळे घरे पडत चालली आहे. घर दुरुस्ती करण्यासाठी तेवढे पैसे सुद्धा गोर गरीब ग्रामस्थांजवळ नाहीत. घर बांधता येत नाही आणि दुरुस्त सुद्धा करता येत नाही. संपूर्ण गावाला वाळविणे पोखरले आहे. अशी बिकट अवस्था JNPT प्रशासनाने येथील ग्रामस्थांची करून ठेवली आहे. ग्रामस्थांनी शासनाच्या सर्वच विभागाशी कायदेशीर पत्रव्यवहार केला. संप, आंदोलने केली तरीही या गावाचे योग्य पुनर्वसन झाले नाही. सुरवातीपासूनच JNPT प्रशासन, महाराष्ट्र राज्य, केंद्र शासनाने जाणून-बुजून या महत्वाच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व ग्रामस्थांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी हनुमान कोळीवाड्यातील ग्रामस्थ JNPT लगत असलेल्या समुद्रात आपली जहाजे, बोटी टाकून JNPT चा सागरी मार्ग अडवून चॅनेल बंद करणार आहेत. यामुळे JNPT पोर्ट बंदरात विदेशातून येणाऱ्या मोठमोठ्या मालवाहू जहाज, बोटी यांचे येण्या-जाण्याचे मार्ग अडविण्यात येणार असल्याने JNPT चे कोट्यावधीचे नुकसान होणार आहे.
JNPT प्रशासनाने योग्य पुनर्वसन न केल्याने प्रकल्पबाधित असलेल्या हनुमान कोळीवाडा गावातील ग्रामस्थांना मिळेल ते काम करावे लागत आहे. आमच्या हक्काच्या जमिनी JNPT प्रकल्पाला दिल्या पण प्रशासनाने प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. जेएनपीटी(JNPT) प्रशासनाने पुनर्वसन केले असते तर आज आमच्या वडिलांचा मासेमारी करताना समुद्रात बुडून मृत्यू झाला नसता. या मृत्युच्या घटनेस सर्वस्वी JNPT प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्यात यावे. प्रशासनाने आमच्या कुटुंबातील एका सदस्यास नोकरी द्यावी तसेच नुकसान भरपाई द्यावी अशी आमची आग्रही मागणी आहे.
– प्रतिभा कृष्णा कोळी (मयत कृष्णा कोळी यांची कन्या तथा ग्रामस्थ हनुमान कोळीवाडा)JNPT प्रशासनाला ३६ वर्षे पूर्ण होऊनही हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. आंदोलन, संप, कायदेशीर पत्रव्यवहार करूनही महाराष्ट्र शासन केंद्र शासन, JNPT प्रशासन येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन करत नाही. मागण्या मान्य न करता, पुनर्वसन न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाचा प्रत्येक वेळी अपमान केला जात आहे. त्यामुळे शासनाने त्वरित आम्हा गावकऱ्यांचे पुनर्वसन करावे. आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा समुद्रात मासेमारीच्या बोटी, जहाजे टाकून चॅनेल बंद आंदोलन करण्यात येईल. होणाऱ्या परिणामास JNPT प्रशासनच पूर्णपणे जबाबदार राहील.
– मंगेश कोळी (अध्यक्ष – ग्रामसुधारणा मंडळ, हनुमान कोळीवाडा)
JNPT च्या भ्रष्ट व ढिसाळ काराभारामुळे गावातील जेष्ठ नागरिक कृष्णा कोळी यांचे पहाटे मासेमारी दरम्यान समुद्रात बुडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरीं मिळालीच पाहिजे, आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अशी आमची आग्रहाची मागणी आहे. मूळ प्रश्न येथील पुनर्वसनाचा व नागरी सेवा सुविधेशी संबंधित असून वर्षानुवर्षे JNPT प्रशासन, राज्य शासन, केंद्र शासनाने येथील ग्रामस्थांनावर अन्याय केला आहे. पुनर्वसनासह सर्वच समस्या प्रलंबित आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळी आश्वासनं देण्यात आली. मात्र कोणतेही सरकार या समस्येकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आता न्याय न मिळाल्यास समुद्रात जहाज, बोटी टाकून समुद्रमार्ग अडवून चॅनेल बंद करण्यात येणार आहे.
– नरेश कोळी (सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामस्थ हनुमान कोळीवाडा)
