गुजरात मध्ये विध्वंस करत अखेर ‘तौक्ते’ चक्रीवादळाची वाटचाल राजस्थानकडे
गुजरात: काल गुजरात आणि दिव चा किनारा पार केल्यानंतर जोर ओसरू लागलेलं ‘तौक्ते’ चक्रीवादळ आज दुपारी १२ वाजता सौराष्ट्रात गडधा गावाजवळ होतं.
ते आता इशान्ये कडे ताशी १० किलोमीटरच्या गतीने जात असून सध्या त्याचा स्वत: भोवती घोंगावण्याचा वेग ताशी ८० ते ९० किलोमीटर आहे. किनारा ओलांडला, तेव्हा या वादळाची घोंगावण्याची गती ताशी १८५ किलोमीटर होती.
आता थोड्याच वेळात त्याचं पुन्हा डिप्रेशन अर्थात न्यूनदाबाच्या पट्ट्यात रुपांतर होईल. हा पट्टा पुढे राजस्थानपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या वादळानं आतापर्यंत अमरेली, ऊना आणि गीर सोमनाथ जिल्ह्यात मोठं नुकसान केलं आहे. या वादळामुळे महाराष्ट्र, केरळ आणि गोवा या राज्यांच्या किनारपट्टी भागातही रविवारी आणि सोमवारी सावधगिरीचा इशारा देण्यात आला होता. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात नऊ जणांचा मृत्यू झाला असून १३ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्हयांतील मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं आहे
