कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या नेत्यांच्या रॅली आणि सार्वजनिक सभांवर बंदी घालण्याचा इशारा
नवी दिल्ली: सर्व राजकीय पक्षांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन करावं, या नियमांचा वारंवार भंग करणाऱ्या नेत्याच्या रॅली आणि सार्वजनिक सभांवर बंदी घालण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा कडक इशारा निवडणूक आयोगानं दिला आहे. निवडणूक प्रचारावेळी कोरोना नियमांचं पालन करण्यात हलगर्जीपणा होत असून विशेषतः मास्क न वापरणे आणि राजकीय सभांमध्ये व्यासपीठावरही सामाजिक अंतर पाळले जात नसल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे. आयोगानं सर्व राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या राजकीय पक्षांना पत्र लिहित, राजकीय प्रचारावेळी कोरोना नियमांचं पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्या उमेदवारांच्या अशा वर्तणुकीमुळं ते स्वत:चा आणि जनतेचाही जीव धोक्यात घालत आहेत, असं आयोगानं निदर्शनास आणून दिलं आहे. कोरोनाविरोधातल्या लढाईत राजकीय नेते आणि त्यांच्या उमेदवारांनी जनतेसमोर आदर्श निर्माण करायला हवा. स्वत: नियम पाळण्याबरोबरच या नेत्यांनी सभांना उपस्थित असलेल्या जनतेलाही कोरोना संसर्गासंदर्भात जाहिर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचा आग्रह करावा, अशी अपेक्षा आयोगानं व्यक्त केली आहे.
