सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील घटना
सिंधुदुर्ग दि.३१ : आज सकाळी ११ वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे नव्याने बांधण्यात आलेला एक उड्डाणपूल कोसळला आहे. सध्या गणेशोत्सवासाठी कोकणवासीय आपापल्या गावाकडे जायला सुरुवात झाली असून त्याचवेळी अशी मोठी दुर्घटना घडल्यामुळे प्रशासनाच्याही तोंडाचे पाणी पळाले आहे.
या दुर्घटनेत कोणीही जखमी अथवा मृत झाल्याची अद्याप माहिती आलेली नाहीये. काही दिवसांपूर्वी या उड्डाणपूलाचा काही भाग कोसल्याची घटना घडली होती. या पुलाच्या कंत्राटदाराला आता काळ्या यादीत टाकण्याची तसेच संबंधित अभियंत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कोकणवासीयांकडून केली जात आहे. या दुर्घटनेनंतर तळकोकणातील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. एकूणच आता भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
