Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मोदींच्या स्वत:च्या गावची परिस्थिती इतकी वाईट असेल तर…. : राज ठाकरे

मोदींच्या स्वत:च्या गावची परिस्थिती इतकी वाईट असेल तर…. : राज ठाकरे

मुंबई : मोदी यांच्या विविध योजनांची व्हिडिओतून समिक्षा करण्याचा शिरस्ता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भांडुप मधील सभेतही कायम ठेवला. राज यांनी या सभेत मोदींनी दत्तक घेतलेल्या गावांसह त्यांच्या स्वत:च्या गावाची दुर्दशा दाखवली. मोदींच्याच गावात महिलांना उघड्यावर बसावे लागत आहे. त्यांच्या गावात शौचालयेच नाहीत. हा माणूस जिथून आला त्या गावाची परिस्थिती अशी असेल, तर तो देश का बदलेल? अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर या मूळ गावातील लोकांनाच शौचालय नसल्‍याने उघड्यावर शौचाला जावे लागते. पुरेशी शौचलये नसल्यामुळे महिला वर्गाला कशा प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागतो ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले गेले. मोदी त्यांनी जाहीर केलेल्या एकाही योजनेवर बोलायला तयार नाहीत. मात्र, योजनांच्या जाहिरातींवर साडेचार हजार कोटींचा खर्च करून जनतेला भुरळ घातली जात आहे. खोटे बोला पण रेटून बोला हाच यांचा उद्योग आहे. मोदींच्या स्वत:च्या गावची परिस्थिती इतकी वाईट असेल तर देशाची किती वाईट असेल याचा विचार करा असे राज म्हणाले.

मुंबईत पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकलच्या अपघातात मोनिका मोरेने दोन्ही हात गमावले होते. त्यानंतर भाजप खासदार किरीट सोमय्यांच्या पुढाकाराने तिला कृत्रिम हात बसवण्यात आले. मोनिका मोरे स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर झाली. भाजपने मोनिकाला नोकरीचं आश्वासन दिले होते त्यांनी ते अजून पर्यंत पूर्ण केले नाही. मला सांगा काय करायचं ह्या मुलीने आयुष्यभर? कोण जबाबदार आहे ह्याला? असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

उज्वल गॅस योजनेच्या पहिल्या लाभार्थी गुड्डी देवी आजही चुलीवर जेवण बनवतात. तीन वर्षात गुड्डी देवींनी फक्त ११ सिलेंडर घेतले आहेत. कारण सिलिंडरचे दर परवडत नसल्यामुळे गुड्डी देवी यांच्यासमोर आजही चुलीवर स्वयंपाक बनवण्याशिवाय पर्याय नाही. सिलेंडर घेणं परवडणं शक्य नाही कारण सिलेंडरच्या किंमती अव्वाच्या सव्वा आहेत. ही परिस्थिती देशभर आहे. सामान्य माणसाने जगायचं तरी कसं? हा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थिताना केला.

मुंबईवरील २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना हेमंत करकरे शहीद झाले. माझ्या शापामुळे हेमंत करकरे गेले असे साध्वी प्रज्ञासिंह म्हणते. असे बोलताना तिला काहीच वाटत नाही. शहीदांचा अपमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंहला उमेदवारी का दिली? साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचे अमित शाह समर्थन करतात. भाजपाला सत्तेचा माज आला आहे अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपाचा समाचार घेतला. पुलवामा हल्ला गुप्तचर अपयश नाही. पुलवामा हल्ल्याआधी बॉम्बस्फोट होऊ शकतो हे सांगितलं होतं. तरीही जवानांना त्या मार्गावरुन का पाठवलं? असा सवाल राज यांनी केला.

विरोधी पक्षात असताना दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ असं मोदी म्हणाले होते. म्हणजे ५ वर्षात १० कोटी लोकांना नोकऱ्या देणार होते. प्रत्येक कुटूंबात ४ माणसं गृहीत धरली तर साधारणपणे ४० कोटी लोकांचं आयुष्य बदलून गेलं असतं. पण ह्यांनी काहीच केलं नाही लोकांना फक्त खोटी स्वप्न दाखवली, आशा शब्दात राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर ताशेरे ओढले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *