Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सार्वजनिक शौचालयांच्या अभावी उलवेकरांना भोगाव्या लागत आहेत नरक यातना

वरिष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अतुल शिलवंत यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालकांचे पत्राद्वारे वेधले लक्ष

उलवे(नवी मुंबई), दि. ९: स्वतःला ‘शहरांचे शिल्पकार’ म्हणवून घेणार्‍या सिडको(CIDCO) महामंडळाने गेल्या ५० वर्षांत टप्प्या-टप्प्याने नवी मुंबईतील विविध नोड ची उभारणी केली. परंतू, मागील काही वर्षांपासून सिडको चा कारभार काहीसा राम भरोसेच चालू असल्याचे पाहायला मिळतेय. सिडको ने नव्याने विकसित केलेल्या उलवे नोड मध्ये याच अजब कारभाराचा नमूना समोर आला आहे. जवळपास २६ सेक्टर्स असलेल्या व पावणेदोन लाख लोकसंख्या असलेल्या उलवे नोड मध्ये सार्वजनिक मुतार्‍या/शौचालयांची वानवा असल्याचे सध्याचे चित्र आहे. वरिष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अतुल शिलवंत यांच्या नजरेस ही समस्या आली असून त्यांनी या प्रकरणी सिडको प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

 

उलवे नोड परिसरात सार्वजनिक शौचालय व मुतार्‍यांची अग्रक्रमाने उभारणी करण्यासाठी अतुल शिलवंत यांनी नुकतेच सिडको चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना एक पत्र लिहिले आहे. आपल्या पत्रात ते म्हणतात की सार्वजनिक शौचालयंच नसल्यामुळे उलव्यातील सामान्य नागरिकांना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुळात उपलब्ध माहिती नुसार १,६८,५६७ इतकी लोकसंख्या असलेल्या उलवे नोड सारख्या स्मार्ट सिटि मध्ये सार्वजनिक शौचालयांची वानवा असणे नक्कीच भूषावह नाही. एकवेळ पुरुषाला लघवीला झाली तर नाईलाजास्तव का असेना तो कुठेतरी कोपरा पाहून लघुशंका करू शकतो पण महिलांचे काय? त्यांनी कुठे जायचं? घरातून कामानिमित्त अथवा शाळा-कॉलेज साठी बाहेर पडणार्‍या महिला वर्गाला जर लघुशंकेला जाण्याची आपत्कालीन परिस्थिति उद्भवली तर त्यांना वाट पाहत आपल्या इस्पित स्थळी पोहोचण्याशिवाय गत्यंतर नाही. भविष्यात यामुळे त्यांना गंभीर शारीरिक व्याधींचा सामना करावा लागू शकतो. याच सोबत मधुमेह, मूत्रपिंडाशी निगडीत आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे तर खूपच हाल होत आहेत.”

आपल्या पत्राच्या शेवटी व्यवस्थापकीय संचालक – सिडको यांना उद्देशून ते म्हणतात की, “मी व माझे सहकारी या पत्राच्या माध्यमातून आपणांस विनंती करतो की आपण सिडको च्या संबंधित विभागास उलवे नोड येथील प्रत्येक सेक्टर मध्ये एक सार्वजनिक शौचालय उभारण्याचे तात्काळ निर्देश वजा आदेश द्यावेत व येथील नागरिकांना विशेषतः स्त्रिया व रुग्णांना भोगाव्या लागणार्‍या नरक यातनांतून त्यांची सुटका करावी.” या समस्ये संदर्भात महाराष्ट्र वार्ता शी बोलताना ते म्हणाले की सिडको सारख्या सक्षम यंत्रणेकडून एवढ्या महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष कसे होऊ शकते हा मोठा सवाल मला पडला आहे. एक जबाबदार रहिवासी व नवी मुंबईकर या नात्याने मी हे पत्र सिडको प्रशासनाला लिहिले आहे. येत्या १० दिवसांत सिडको प्रशासनाने आमच्या पत्राची दखल न घेतल्यास मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागण्याचा मार्ग आमच्याकडे मोकळा आहे.”

या सार्‍या पार्श्वभूमीवर एक प्रश्न चमकून जातो तो म्हणजे, जवळपास २६ च्या वर सेक्टर्स(विभाग) व आज मितीस एक सोडून दोन उपनगरीय रेल्वे स्थानकं असलेल्या उलवे नोड ची उभारणी करताना सिडको महामंडळ शहरातील नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालयं बांधायला नेमकं कसं काय विसरलं? या ठिकाणी मुळात शहराच्या आकारमानासोबत  लोकसंख्या वाढत असताना प्रशस्त रस्ते, गटारं यांची उभारणी करताना मुतार्‍या-शौचालयं बांधण्याचा विचार सिडको सारख्या नगर नियोजनकर्त्यांच्या डोक्यात कसा आला नाही हे खरंच एक मोठं कोडं आहे.

सामाजिक कार्यकर्ते अतुल शिलवंत यांनी उलवेकरांना आपल्या या मोहीमेत सामील होण्याचं आवाहन केलं आहे. मोहिमेत सामील होण्यासाठी अतुल शिलवंत यांना 8451835404 क्रमांकावर व्हाट्सअप मार्फत संपर्क साधता येऊ शकतो.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *