भिवंडीत मिथेनॉलचा मोठा साठा जप्त; विषारी दारू प्रकरणानंतर एफडीएची राज्यव्यापी धडक मोहीम
ठाणे/भिवंडी, दि. ३१ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर विशेष तपास मोहीम हाती घेतली असून, भिवंडी येथे मोठी कारवाई करत तब्बल ५ हजार ९२९ किलोग्रॅम मिथेनॉलचा साठा जप्त केला आहे. प्राथमिक चौकशीत या विषारी रसायनाचा संबंध पुणे परिसरातील कथित विषारी दारू प्रकरणाशी असल्याचे समोर आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा आस्थापनाविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पुणे दुर्घटनेनंतर तपासाला वेग
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मृत व्यक्तींनी फुगेवाडी परिसरात हातभट्टीची दारू सेवन केल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणाचा तपास करताना दारू पुरवठ्याची संपूर्ण साखळी उलगडण्यात आली. तपासात संबंधित दारूमध्ये वापरण्यात आलेले मिथेनॉल भिवंडीस्थित एका व्यावसायिक आस्थापनामार्फत पुरविण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाने भिवंडीतील वळगाव परिसरात असलेल्या मेसर्स रेक्स इंटरनॅशनलच्या गोदामावर धाड टाकली. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर मिथेनॉलचा साठा आढळून आला.
आवश्यक नोंदी व कागदपत्रांचा अभाव
कारवाईदरम्यान कंपनीचे मालक अरुणकुमार चौबे आणि अधिकृत प्रतिनिधी अभिषेक चौबे उपस्थित नव्हते. अधिकाऱ्यांनी साठ्याची तपासणी केली असता मिथेनॉलच्या खरेदी-विक्री, साठवणूक आणि वितरणासंदर्भातील आवश्यक नोंदी, साठा नोंदवही तसेच इतर कायदेशीर कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे आढळले.
विषारी द्रव्यांबाबत लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने संपूर्ण साठा जप्त करण्यात आला. यानंतर संबंधितांविरुद्ध भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे विभागाने संबंधित आस्थापनास कारणे दाखवा नोटीस बजावली असून, विषारी द्रव्य अधिनियमांतर्गत परवाना रद्द करण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व आर्थिक व्यवहार, पुरवठा साखळी आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे.
राज्यभर तपास आणि विशेष मोहीम
पुणे दुर्घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर मिथेनॉलच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे. औद्योगिक वापरासाठी असलेले मिथेनॉल अवैधरित्या मद्यनिर्मितीसाठी वापरले जात असल्याच्या संशयावरून अनेक ठिकाणी तपास मोहीम राबविण्यात येत आहे.
तज्ज्ञांच्या मते, मिथेनॉल हे अत्यंत विषारी रसायन असून त्याचे सेवन झाल्यास अंधत्व, अवयव निकामी होणे आणि मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे अशा रसायनांच्या वितरणावर काटेकोर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक मानले जाते.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना अवैध मद्यविक्री, संशयास्पद रासायनिक साठे, औषधांमधील भेसळ किंवा बेकायदेशीर व्यापाराबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. तक्रारीत संबंधित आस्थापनाचा पत्ता, संपर्क माहिती आणि उपलब्ध पुरावे नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची गोपनीयतेने चौकशी करून तातडीने कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तक्रार प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल अनुप्रयोग आणि टोल-मुक्त हेल्पलाईन सेवा सुरू करण्याची तयारीही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य
“सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. कायद्याचे उल्लंघन करून जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही,” असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. राज्यातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले.
