नागपूर शहरातील विविध विकासकामांचा आणि नागरिकांच्या समस्यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आढावा
नागपूर, दि. १३ : नागपूर शहरातील पायाभूत सुविधा आणि नागरी विकास प्रकल्पांची गती वाढवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. शहरातील विविध प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास आणि एमएसआयडीसी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन झोननिहाय भाजी मार्केट, मटण-मच्छी मार्केट, फूड मॉल तसेच हॉकर झोन विकसित करण्याबाबत नियोजन करण्यावर भर देण्यात आला. याशिवाय सिमेंट रस्ते टप्पा-५, यशवंत स्टेडियम पुनर्विकास, अनधिकृत वसाहतींतील मूलभूत सुविधा, नाग आणि पोहरा नदी प्रकल्प, भुयारी गटार योजना, सांडपाणी व्यवस्थापन आणि पावसाळी नाल्यांसाठी निधी या विषयांवरही चर्चा करण्यात आली.
घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने भांडेवाडी प्रकल्प, बायोगॅस निर्मिती आणि कंपोस्ट प्रकल्पांची प्रगती तपासण्यात आली. पारडी येथील बाजार आणि गड्डीगोदाम प्रकल्पाबाबतही आढावा घेण्यात आला.
नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत नवीन रिंग रोड, गणेशपेठ एसटी स्थानक विकास, गोकुळपेठ व कळमणा बाजार, तसेच इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कामांची स्थिती तपासण्यात आली. तसेच मानकापूर क्रीडा संकुल आणि मिहान प्रकल्पाशी संबंधित उद्योग, सवलती व पुनर्वसन कामांवरही सविस्तर चर्चा झाली.
एमएसआयडीसी अंतर्गत कॉटन मार्केट, संत्रा मार्केट, इतवारी बाजार, फुलमार्केट, मोरभवन, गणेशपेठ बसस्थानक, दाभा येथील आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र, बॉटनिकल गार्डन प्रकल्प तसेच नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या स्थानांतरणाच्या मुद्द्यांचाही आढावा घेण्यात आला.
या सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने करण्यावर भर देत नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र व राज्य शासन समन्वयाने काम करणार असल्याचे मंत्री गडकरी यांनी स्पष्ट केले.
