सचिन सूर्यवंशी दिग्दर्शित ‘द सॉकर सिटी’ शॉर्टफिल्म ला मानाचा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर
कोल्हापूर: कोल्हापुरातील फुटबॉल खेळाचा इतिहास देशासमोर मांडणारे दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांच्या ‘द सॉकर सिटी’ या लघुपटास मानाचा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला आहे.
२३ मार्चला (शनिवारी) मुंबईत होणाऱ्या फिल्मफेअर सोहळ्यात अभिनेता शाहरूख खान व रणवीर सिंग यांच्या हस्ते दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कोल्हापूरच्या फुटबॉल संस्कृती व इतिहासावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘द सॉकर सिटी’ या शॉर्टफिल्ममध्ये अवघ्या २० मिनिटांत सचिन सूर्यवंशी यांनी हा फुटबॉलचा प्रवास मांडला आहे. यात वयाची पंच्याहत्तरी झालेले ज्येष्ठ खेळाडू आपल्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत.
फुटबॉल महासंग्रामचे संयोजक सतीश सूर्यवंशी हे या शॉर्टफिल्मचे सहनिर्माते असून, सचिन सूर्यवंशी यांनी या शॉर्टफिल्मचे
दिग्दर्शन केले आहे. तर किरण देशमुख यांचे संकलन आहे. या शॉर्टफिल्मध्ये अभिनेते सागर तळाशीकर यांनी व्हॉइसओव्हर दिला आहे. अमित पाध्ये यांचे संगीत असून समीर शेलार, अजित हारूगले, मिनार देव, पवन माने व विराज माने यांच्यासह अर्निका व विवेक पाध्ये या टीमने या शॉर्टफिल्मसाठी खूप कष्ट घेतले आहेत.