पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी ताथवडे येथे २० हेक्टर जागा हस्तांतरणाला मान्यता; स्वतंत्र प्रशासकीय संकुलाचा मार्ग मोकळा
मुंबई, दि. २२ : पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राऊंड तसेच विविध अनुषंगिक कार्यालयांच्या उभारणीसाठी पुणे जिल्ह्यातील ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील २० हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्यता दिली आहे.
मुख्यमंत्री यांच्या अंतिम मंजुरीनंतर येत्या दोन ते तीन दिवसांत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असून त्यानंतर जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.
या प्रस्तावास यापूर्वी १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार ताथवडे येथील वळूभाता प्रक्षेत्रातील एकूण ६७ हेक्टर ९४ आर क्षेत्रापैकी २० हेक्टर जागा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी, परेड ग्राऊंडसाठी आणि इतर आवश्यक प्रशासकीय कार्यालयांसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर गृह विभागाने शासनाच्या ८ सप्टेंबर २००८ रोजीच्या धोरणात्मक तरतुदींनुसार जमीन हस्तांतरणाची पुढील कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठविला होता. त्यानंतर संबंधित विभागांनी प्रस्तावाची तपासणी करून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली.
पिंपरी-चिंचवड हे राज्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक मानले जाते. औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी विस्तारामुळे शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येसोबतच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आधुनिक आणि सर्वसमावेशक पोलीस पायाभूत सुविधा उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र आणि सुसज्ज पोलीस आयुक्तालय संकुल उभारण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
यापूर्वीही पोलीस विभागासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. हवेली तालुक्यातील मौजे चिखली येथील गट क्रमांक ५३९ मधील ३ हेक्टर ३९ आर जमीन पोलीस आयुक्तालय कार्यालय, निवासस्थाने आणि परेड ग्राऊंड या उद्देशांसाठी पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांना ९ जुलै २०२४ रोजीच्या शासन ज्ञापनाद्वारे प्रदान करण्यात आली होती.
ताथवडे येथील नव्याने मंजूर करण्यात आलेल्या २० हेक्टर जागेमुळे भविष्यात अत्याधुनिक प्रशासकीय इमारती, प्रशिक्षण सुविधा, परेड मैदान, विविध विभागांची कार्यालये तसेच पोलीस यंत्रणेच्या वाढत्या गरजांनुसार आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करणे शक्य होणार आहे. यामुळे पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास आणि नागरिकांना अधिक प्रभावी सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
महसूल मंत्र्यांच्या मान्यतेनंतर आता मुख्यमंत्री यांच्या अंतिम मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होताच शासन निर्णय जारी केला जाणार आहे. त्यानंतर जमीन हस्तांतरणाची औपचारिक कार्यवाही पूर्ण होऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्वतंत्र व सर्वसमावेशक प्रशासकीय संकुलाच्या उभारणीचा मार्ग अधिकृतपणे मोकळा होणार आहे.
या संदर्भात आयोजित बैठकीस आमदार महेश लांडगे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रकल्पाच्या विविध प्रशासकीय बाबींचा आढावा घेण्यात आला आणि पुढील कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
