“शिवसेनेसोबत सरकारमध्ये जाणं म्हणजे काँग्रेसला गाडण्यासारखं आहे” : संजय निरुपम यांचा सोनिया गांधींना इशारा
मुंबई: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेच्या हालचाली चालू असून कालच याबाबत शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. एका बाजूला काँग्रेसचे केंद्रातील व महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते सेनेसोबत जाण्यास अनुकूल असताना मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हे आपल्या वक्तव्यांनी खो घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते आहे.
आज सकाळी त्यांनी एक ट्विट करत पुन्हा एकदा काँग्रेस नेत्यांना उद्देशुन काही उपदेश दिले. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, “काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात बीएसपी सोबत युती करण्याची घोडचूक केली होती. तेव्हा जो फटका पडलाय तो अद्याप उठू शकलेली नाही. महाराष्ट्रात आपण तीच चूक करत आहोत. शिवसेनेच्या सरकार मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनणं काँग्रेसला इथे गाडण्यासारखं आहे. असं योग्य ठरेल की काँग्रेस अध्यक्ष दबावात येऊ नये.”
शिवसेना काँग्रेस सोबत जाण्याच्या जेव्हा चर्चा सुरू झाल्या तेव्हा पासून संजय निरुपम हे निरनिराळे ट्विट करत आपला या आघाडीसाठी विरोध दर्शवत आहेत.
