मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सोडली अजित पवारांची साथ; शरद पवारांच्या उपस्थितीत हाती घेतली तुतारी !
मुंबई, दि. १९: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व माजी पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य हे देखील उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेव्हा काका शरद पवार यांची साथ सोडत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर दावा ठोकला तेव्हा राजेंद्र शिंगणे अजित पवारांची साथ दिली. यानंतर नाट्यमयरीत्या राजेंद्र शिंगणे यांची पुतणी असेलेल्या गायत्री शिंगणे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. दरम्यान, मागील एक वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा फक्त एकंच खासदार निवडून आला. यानंतर शरद पवार यांच्या पक्षात इन्कमिंगला सुरुवात झाली. काका राजेंद्र शिंगणे यांच्या घरवापसिमुळे पुतणी गायत्री शिंगणे या व्यथित झाल्याचे दिसते. त्यांनी थेट शरद पवार यांना “शरद पवार साहेब निष्ठावंतांचं काय” असा थेट सवाल केला आहे. राजेंद्र शिंगणे ही सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून कार्यकर्त्यांच्या दबाव राहिल्यामुळे त्यांनी तुतारी हाती घेतल्याचे कळते.
