पात्र उमेदवारांना १५ दिवसांची मुदत; निवड झालेल्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी
मुंबई, दि. १७: मुंबई उपनगर जिल्ह्यात पॉक्सो प्रकरणांतील पीडित बालकांना न्यायालयीन आणि इतर आवश्यक प्रक्रियेत मदत करण्यासाठी ‘सपोर्ट पर्सन’ची नियुक्ती केली जाणार आहे. या भूमिकेसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्तींना अर्ज करण्याची संधी देण्यात आली असून, अर्ज सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित बालकाला पोलीस, रुग्णालय, बाल कल्याण समिती आणि न्यायालयीन प्रक्रियेसह विविध टप्प्यांवर मार्गदर्शन व आधाराची गरज असते. अशा वेळी बालकाच्या हिताचे संरक्षण आणि आवश्यक समन्वय साधण्याच्या दृष्टीने ‘सपोर्ट पर्सन’ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
कोण करू शकते अर्ज?
सामाजिक कार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा बालविकास यापैकी कोणत्याही विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या नियुक्तीसाठी पात्र आहेत.
याशिवाय बालशिक्षण व विकास किंवा बालसंरक्षणाच्या क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असलेले पदवीधरही अर्ज करू शकतात. उमेदवाराकडे ‘एमएस-सीआयटी’ किंवा संगणकाचे ज्ञान असल्याचे अन्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
बालहक्क अथवा बालसंरक्षणासाठी कार्यरत असलेल्या संस्था, तसेच बालगृह आणि निवारा गृहांमधील बालकांच्या देखरेखीशी संबंधित अधिकारी यांचाही पात्र उमेदवारांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
कुठे सादर करायचा अर्ज?
इच्छुक उमेदवारांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मुंबई उपनगर यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावा. हे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा टप्पा, पहिला मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-७१ येथे आहे.
अर्जासंदर्भातील माहिती किंवा इतर चौकशीसाठी wcd_mumupanagar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.
तीन वर्षांची नियुक्ती
निवड झालेल्या ‘सपोर्ट पर्सन’ची नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी केली जाणार आहे. त्यांना देण्यात येणारे मानधन निश्चित मासिक स्वरूपात नसून, संबंधित प्रकरणांची संख्या, प्रत्यक्ष कामाचे दिवस आणि विविध ठिकाणी केलेल्या प्रत्यक्ष भेटींच्या आधारे दिले जाणार आहे.
या कामाच्या अनुषंगाने रुग्णालये, बाल कल्याण समिती, पोलीस ठाणे, बालसंगोपन संस्था, पीडित बालकाचे कुटुंब, शैक्षणिक संस्था, न्यायालये, शासकीय कार्यालये तसेच बँक आदी ठिकाणी भेटी देण्याची आवश्यकता असू शकते.
पात्रता असलेल्या व्यक्तींनी निर्धारित मुदतीत अर्ज सादर करून या नियुक्ती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे यांनी केले आहे.

