सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना स्पष्ट दिसत असतानाही मोबाईल पडून गहाळ झाल्याची नोंदवली होती तक्रार
पनवेल, दि. ६ : सोमवार दिनांक ३० जून २०२५ रोजी पनवेल येथील एका डायग्नोस्टिक सेंटर मध्ये मोबाईल चोरीची घटना घडली होती. चोराचा हा सर्व कारनामा तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. ज्या महिलेचे दोन्ही मोबाईल फोन चोरीला गेले होते तिने तात्काळ पनवेल शहर पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली होती. परंतु, संबंधित पोलिसांनी सदरची तक्रार नोंदवताना महिला फिर्यादीची दिशाभूल करत मोबाईल पडून गहाळ झाल्याचे नमूद करत त्याची एफआयआर न नोंदवता फक्त ‘हरवलेल्या मालमत्तेची नोंदणी’ या प्रकारात तक्रार दाखल केली.
तीन दिवस खेपा मारूनही पोलीस दाद देत नसल्यामुळे अखेर फिर्यादीने महाराष्ट्र वार्ता ला संपर्क साधला व घडलेली सर्व हकीकत सांगितली. या घटनेची खातरजमा करत महाराष्ट्र वार्ता ने दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सविस्तर बातमीच्या माध्यमातून पनवेल शहर पोलिसांचे प्रताप उघड केले. बातमी समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर अखेर २४ तासांच्या आत, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घालत महिला फिर्यादीस पोलीस स्थानकात बोलावून घेतले व सदर प्रकरण जाणून घेत तात्काळ एफआयआर नोंदवून घेण्यास कनिष्ठांना निर्देश दिले. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या(BNS) कलम ३०५ अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपासास सुरुवात केली आहे.
पनवेल शहर पोलिसांचे प्रताप; फोन चोरीच्या प्रकरणात महिला फिर्यादीची दिशाभूल करत खोटी तक्रार नोंदवली
अशा प्रकारच्या मनस्तापाचा सामना करण्याची वेळ येऊ नये म्हणून नागरिकांनी हि कायद्याचे थोडेफार ज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणत्या कायद्याच्या विद्यापीठात प्रवेश घेण्याची काहीच गरज नाही. भारतीय न्याय संहिता व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यांची पुस्तक संग्रही असावीत. ती वाचली तरी खूप झालं. हि पुस्तकं आजकाल सहज उपलब्ध आहेत. शिवाय भविष्यात कधी पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ आलीच तर पुढील काही टिप्स तुम्ही लक्षात ठेवू शकता.
१. कधीही चोरी, मारामारी अथवा कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी घटना घडली तर ताबडतोब आधी ११२ अथवा १०० क्रमांकावर कॉल करत घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला (Control room) द्यावी व पोलिसांना पाचारण करावे.
२. ११२ अथवा १०० क्रमांकावर कॉल करूनही पोलीस जर वेळेत आले नाहीत तर गुन्हा घडला त्या हद्दीतील पोलीस स्टेशन गाठा. थांबा! तिथे हात हलवत रिकाम्या हाती जात तोंडी तक्रार नोंदवू नका. जे काही घडलं असेल त्याचा घटनाक्रम तुम्हाला जमेल तसं साध्या सोप्या मराठी भाषेत(शासकीय भाषा) एका कागदावर लिहून काढा. अगदी समजेल अशा बोली भाषेत लिहिलंत तरीही चालेल.
३. या अर्जाची एक छायांकित(झेरॉक्स) प्रत काढा व मूळ अर्ज जमा केल्यावर त्याची पोच पोलिसांकडून घ्या. याचा फायदा भविष्यातील कायदेशीर लढाईसाठी तर होतोच सोबतीला पोलिसांनाही तुमचं प्रकरण समजण्यास मदत होते व पुढील कार्यवाहीदरम्यान होऊ शकणार कालापव्यय टळतो.
४. दखलपात्र अथवा अदखलपात्र गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेचा महत्वाचा भाग असलेला जबाब नोंदवताना हि तो आपण लिहून आणावा जेणेकरून पोलिसांचेही काम सोप्पे होते. शिवाय, चुकीचा घटनाक्रम प्रथम माहिती अहवाल म्हणजेच एफआयआर(FIR) नोंदवला जाऊन तपास कामादरम्यान तसेच भविष्यात कोर्टात आपली केस कमजोर होण्यापासून आपला बचाव करता येऊ शकतो.
५. पोलिसांकडे पुरावे जमा करतेवेळी जेव्हा ते ‘पेन ड्राईव्ह’ मधून दिले जातात तेव्हा त्याची हॅश व्हॅल्यू, हॅश कॅलक्युलेटर मधून मोजून त्याची नोंद पंचनाम्यात केली जात आहे कि नाही त्याची फिर्यादीने खातरजमा करावी. ‘पेन ड्राईव्ह’ पोलिसांच्या रेकॉर्ड ला जमा करते वेळी शक्यतो आपल्या ओळखीतली २ माणसं साक्षीदार म्हणून घेऊन जावीत.
वर थोडक्यात नमूद केलेल्या टिप्स नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. तूर्तास, पनवेल येथील मोबाईल फोन चोरीच्या घटनेतील रेकॉर्ड वरील या चतुर चोरापर्यंत पोलीस किती चपळाईने पोहोचतात व सोबतच या प्रकरणात खोटा गुन्हा नोंदवून घेणाऱ्या चौकशी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय अस्पतवार(Sanjay Aspatwar Police Sub-Inspector) यांच्यावर नवी मुंबई पोलीस आयुक्त काय कारवाई करतात हेही पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
