गणेशोत्सव नियोजनविषयक बैठकीत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे सुव्यवस्थेविषयी स्पष्ट निर्देश
नवी मुंबई, दि. १४: श्रीगणेशोत्सव २०२५ सुव्यवस्थित रितीने संपन्न व्हावा यादृष्टीने सर्व शासकीय प्राधिकरणे आणि श्रीगणेशोत्सव मंडळांची नियोजन बैठक महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २५ जुलै २०२५ रोजी संपन्न झाली होती. या बैठकीच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांनुसार केलेल्या कार्यवाहीचा आढावा आज महापालिका मुख्यालयात आयुक्तांनी संबधित अधिका-यांसमवेत विशेष बैठकीत घेतला.
यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांना देण्यात येणा-या मंडप परवानगीसाठी १४७ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. गतवर्षीच्या मंजूरीचा आढावा घेऊन इतरही मंडळांनी लवकरात लवकर परवानगी घ्यावी याबाबत आवाहन करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. गणेशोत्सवासाठी श्रीमूर्ती आणतांना व विसर्जनासाठी नेतांना नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यादृष्टीने पावसाची थोडीशी उघडीप मिळाल्यानंतर त्वरित रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करण्याच्या सूचना देत यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा चालणार नाही असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. गणेशोत्सव काळात सर्वत्र मोठया प्रमाणावर होर्डिंग/बॅनर लावून शहर विद्रूपीकरण केले जाते. याकरिता विभाग कार्यालयांनी आधीपासूनच दक्षता घेऊन सर्व गणेशोत्सव मंडळांना नियमानुसार परवानगी घेऊनच होर्डिंग/बॅनर लावण्याचे सूचित करावे असे निर्देशीत करण्यात आले. अनधिकृत बॅनरवर कडक कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले.
शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग होत असल्याने वाहतुकीला मोठया प्रमाणावर प्रतिबंध निर्माण होतो. याकरिता वाहतुक पोलीस विभागाचे सहकार्य घेऊन रस्ते वाहतुकीला खुले राहतील अशाप्रकारे कार्यवाही करावी व ही कार्यवाही नियमितपणे राहील याची दक्षता घ्यावी असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
गणेशोत्सव कालावधीत पाणी पुरवठा सुरळीत राहील याचे नियोजन करावे तसेच स्वच्छतेबाबतही काटेकोर दक्षता घेण्यात यावी याबाबत निर्देश देण्यात आले. यामध्ये निर्माल्याचे स्वतंत्र संकलन व त्याची योग्य विल्हेवाट याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्याचप्रमाणे गणेशोत्सव सजावटीत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा याविषयी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले.
गणेशोत्सव कालावधीत मोठया प्रमाणावर नागरिक आपल्या मूळ गावी जात असतात याकरिता महामार्गांवर नागरिकांना सार्वजनिक वाहनांची वाट पाहत उभे रहावे लागते. नागरिकांचा हा त्रास वाचण्यासाठी बस डेपोच्या ठिकाणी ही खाजगी वाहने आल्यास नागरिकांना सोयीचे होईल हे लक्षात घेउुन तशा प्रकारचे नियोजन संबधितांशी बोलून वाहतूक विभागाच्या पोलीसांच्या सहकार्याने करावे असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळांवर लावण्यात येणारे सीसीटिव्ही कॅमेरे हायडेफिनेशनचे असतील याची दक्षता घेण्याचाही सूचना यावेळी देण्यात आल्या.
नवी मुंबई हे आपले शहर आधुनिक शहर म्हणून नावाजले जात असून नवी मुंबईत उत्साहाने साजरा होणारा श्रीगणेशोत्सव शहराच्या नावलौकिकाला साजेसा पर्यावरणपूरक साजरा व्हावा याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करण्यात यावे असे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, वाहतूक पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे, परिमंडळ 1 उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त संजय शिंदे, परिवहन व्यवस्थापक योगेश कडूसकर, अति. शहर अभियंता अरविंद शिंदे, अतिक्रमण उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे व स्मिता काळे तसेच सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
