तर सुरेंद्र डंगवाल यांनी पटकाविला ‘नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री’ किताब
नवी मुंबई, दि. २०: नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करून नवी मुंबईतील खेळाडू व कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत असते. यामधील एक महत्त्वाचा उपक्रम हा ‘नवी मुंबई महानगरपालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा असून १९९६ सालापासून सातत्याने आयोजित केला जात आहे. या माध्यमातून नवी मुंबईतील उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटूंना संधी मिळावी या दृष्टीने राज्यस्तरीय स्पर्धेप्रमाणेच ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा’ देखील आयोजित करण्यात येते. अशाच प्रकारची यावर्षीची स्पर्धा विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये राज्यभरातील तसेच नवी मुंबईतील २०० हून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी पूर्ण क्षमतेने सहभागी होत यशस्वी केली.
‘नवी मुंबई महानगरपालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा’ यामध्ये पुणे जिल्ह्याच्या शशांक वाकडे या शरीरसौष्ठवपटूने नवी मुंबई महानगरपालिका राज्यस्तरीय श्री बहुमान पटकावला. सोलापूर जिल्ह्याचे शरीरसौष्ठवपटू पंचाक्षरी लोणार यांनी उपविजेतेपद संपादन केले. मुंबई जिल्ह्याचे निलेश दगडे यांनी ‘मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर’ किताब तसेच पालघर जिल्हयाच्या लकपा लामा यांनी ‘बेस्ट पोझर’ किताब मिळविला. ५५ किलो, ६० किलो, ६५ किलो, ७० किलो, ७५ किलो, ८० किलो, ८५ किलो व ८५ किलोवरील अशा एकूण ८ वजनी गटातील प्रत्येकी सहा विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.
त्याचप्रमाणे ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा’ यामध्ये सुरेंद्र डंगवाल यांनी ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ हा प्रथम क्रमांकाचा चषक संपादन केला. शरीरसौष्ठवपटू प्रशांत गुरव यांनी उपविजेतेपद पटकाविले. ५० किलो, ५५ किलो, ६० किलो, ६५ किलो, ७० किलो व ७० किलो पुढील अशा विविध वजनी गटांत प्रत्येक वजनी गटातील अनुक्रमे ५ विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डाॅ. संजीव नाईक, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव तसेच शरीरसौष्ठव क्षेत्रातील मान्यवर महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सचिव राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष गोपाळ गायकवाड, पदाधिकारी शरद मारणे तसेच नवी मुंबई बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सचिव हेमंत खेबडे, ठाणे पश्चिमचे राजन परब, अहिल्यानगरचे मयूर दरंदळे आणि प्रभाकर कदम तसेच या दोन्ही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी शरीरसौष्ठवपटूंना शुभेच्छा देताना महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आरोग्याचे महत्व अधोरेखित करीत युवा पिढीला व्यायामाची आवड लावणाऱ्या शरीरसौष्ठवासारख्या क्रीडाप्रकाराला नवी मुंबई महापालिका सातत्याने प्रोत्साहन देत असून या माध्यमातून युवकांमध्ये प्रेरणा निर्माण करीत असल्याचे सांगितले. अंमली पदार्थाचे आरोग्यावर भीषण परिणाम होतात हे लक्षात घेऊन शरीराची होणारी अपरिमित हानी टाळण्यासाठी युवकांनी त्यापासून निग्रहाने दूर राहिले पाहिजे व त्याकरिता व्यायामाची आवड जोपासली पाहिजे असे आयुक्त म्हणाले. माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनीही शरीरसौष्ठवपटूंना शुभेच्छा दिल्या. नवी मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंना उत्तेजन मिळावे व त्यांना राज्यभरातील इतर शरीरसौष्ठवपटूंकडून प्रेरणा मिळावी या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका राज्यस्तरीय श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे १९९६ पासून आयोजन करीत असून त्यामध्ये नवी मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंसाठी स्वतंत्र स्पर्धा घेऊन त्यांना उत्तेजन देण्याचे काम करीत आहे. यामध्ये नवी मुंबईसह राज्यभरातील २०० हून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेत स्पर्धा यशस्वी केली.
