३००० हून अधिक नागरिक सहभागातून नवी मुंबई परिसरामध्ये महा स्वच्छता अभियान संपन्न
नवी मुंबई, दि. ४: नवी मुंबई हे दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे शहर असून नवी मुंबईतील अनेक क्षेत्रे वर्दळीची आहेत. या रस्त्यांची नियमित स्वच्छता करण्याप्रमाणेच विशेषत्वाने महामार्ग व दुर्लक्षित ठिकाणे यांची सखोल स्वच्छता करण्याकडे महापालिका आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष देण्यात येत आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या सुपर स्वच्छ लीग या विशेष कॅटेगरीत देशातील तीन शहरांमध्ये समाविष्ट असलेल्या नवी मुंबईचा स्वच्छ शहर हा नावलौकिक कायम रहावा यादृष्टीने महानगरपालिका नेहमीच सतर्कतेने कार्यरत असते. याकामी नागरिकांचाही विविध उपक्रमांमध्ये विशेष सहभाग असतो.
याच अनुषंगाने डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ निरूपणकार डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या 103 व्या जयंती दिनानिमित्त रविवारी नवी मुंबई परिसरामध्ये ‘महा स्वच्छता’ अभियानाचे विशेष आयोजन करण्यात आले.
त्यानुसार रविवारच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी स्वच्छता मोहीमेत व्यापक प्रमाणात लोकसहभाग लाभेल या भूमिकेतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभागांत रस्त्यांच्या दुतर्फा स्वच्छता मोहीमेचे नियोजन करण्यात आले. स्वच्छताविषयक उपक्रमांनी प्रेरित झालेल्या 3050 हून अधिक श्रीसदस्य नागरिकांनी नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांची साफसफाई करुन यशस्वीरित्या मोहीम राबवली.
सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेल्या या महा स्वच्छता मोहीमेचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. वाशी, नेरूळ, बेलापूर, कोपरखैरणे, ऐरोली, या विभाग कार्यालयांच्या हद्दीत येणा-या सर्व अंतर्गत रस्त्यांच्या स्वच्छता मोहीमेत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य यांना अंतर्गत रस्त्यावरील क्षेत्र वाटप करून देण्यात आले होते.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 1 उपायुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ 2 उपायुक्त संतोष वारुळे तसेच परिमंडळ 1 उपायुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व स्वच्छताकर्मी यांनी सहभागी होत ही विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी केली.
