नेरुळ येथील बहुप्रतीक्षित छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण संपन्न
नवी मुंबई, दि. २२: नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने से. १ नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण तसेच से. १५ नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात मायक्रोबायलॉजी प्रयोग शाळेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, बेलापूर विधानसभा सदस्य आ. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, शहर अभियंता शिरीष आरदवाड, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, माजी महापौर जयवंत सुतार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यासाठी रायगडावर पूजा करणारे पुजारी कृष्णा पाटील, ज्ञानेश्वर लोहार, अनंत केरेमणी उपस्थित होते. संपूर्ण चौक शिवभक्तांच्या गर्दीने फुलून आला होता. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी – जय शिवाजी’ अशा ललका-यांनी नागरिक शिवप्रभूंच्या नावाचा गजर करीत होते.
नेरुळ से. १ येथे राजीव गांधी उड्डाण पुलाजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रचलीत असून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा अशी मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून सातत्याने होत होती. त्यास अनुसरुन या चौकामध्ये असलेल्या घुमटाकार मेघडंबरीखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ब्रॉन्झ धातूच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सिंहासनासह १२ फूट उंच व २.५ टन वजनाचा असलेल्या या प्रेरणादायी पुतळ्याच्या भोवती ऐतिहासिक वातावरण निर्मितीसाठी सभोवतालच्या क्षेत्राचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्याठिकाणी ४ भाला धरलेले मावळे आणि तोफांसहित ३ मावळे यांच्या शिल्पाकृती उभारण्यात आल्या आहेत. शिल्पसृष्टी कला प्रतिष्ठानचे प्रमुख शिल्पकार प्रा. मोरेश्वर पवार यांनी पुतळ्याची निर्मिती केली आहे. पुतळा स्थापनेसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय परवानग्या प्राप्त आहेत.
अनावरणासाठी रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी नुकतेच अनावरण केले होते. ज्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. अमित ठाकरेंच्या या कृतीचे त्यांच्या मातोश्री शर्मिला ठाकरे व शिवसेना ठाकरे गटाचे नेते युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी समर्थन केले होते.
