“काश्मीर मध्ये मेहबूबा मुफ्ती आणि भाजप मध्ये झालं तो काय लव्ह जिहाद होता का?”; संजय राऊत संतापले
मुंबई: प्रचंड राजकीय उलथापालथी दरम्यान आज सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला खडे बोल सुनावले की, “सत्तास्थापन न करता आलेल्या भाजपने शिवसेनेवर खापर फोडू नये. जे खोटं बोलले, ज्यांनी खोटं बोलून महाराष्ट्राला या परिस्थितीत ढकललं ते या महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत.”
एका पत्रकाराने शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेच्या भिन्नतेबद्दल छेडल्यावर संजय राऊत म्हणाले की काश्मीर मध्ये मेहबूबा मुफ्ती आणि भाजप मध्ये झालं तो काय लव्ह जिहाद होता का?
या वेळी ते म्हणाले की, “भाजपच्या नेत्यांचं निवेदन हे अत्यंत दुखद आणि खेदजनक आहे. भाजप सत्तास्थापन करू शकला नाही. याचं खापर शिवसेनेवर फोडणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. युतीवेळी जे ठरलं त्याप्रमाणे कार्यवाही जर झाळी असती तर आम्ही प्रसंगी विरोधीपक्षात बसायला तयार आहोत हे सांगण्याची वेळ आमच्या मित्रपक्षावर आली नसती. हा एक अहंकार आहे. आम्ही विरोधीपक्षात बसू, प्रसंगी आम्ही सत्ता लाथाडू पण शिवसेनेला ठरल्याप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि ५०-५० टक्के हा फार्म्युला मान्य करणार नाही. विरोधीपक्षात बसू, इतरांच्या हातात सत्ता देऊ पण शिवसेनेला ठरल्याप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्र्याचं पद देणार नाही, या द्वेषाच्या आणि अहंकाराच्या भूमिकेतूनच महाराष्ट्रावर ही वेळ आली. जे मित्रपक्षात ठरलं होतं, त्याची अंमलबजावणी करणं याची सर्वात जास्त जबाबदारी ही भाजपवर होती. त्यांनी शिवसेनेवर खापर फोडू नये, दोष देऊ नये. उद्धव ठाकरेंना दोष देऊ नये.”
