कुलभूषण जाधव प्रकरणी आज ‘हेग’चं आंतरराष्ट्रीय न्यायालय देणार निकाल
हेग: पाकिस्तानच्या कारागृहात बंदी असलेले नौसेनेचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावर आज १७ जुलै रोजी नेदरलँड्स इथलं हेग चं आंतरराष्ट्रीय न्यायालय निकाल देणार आहे. भारतीय वेळेनुसार हा निकाल सायंकाळी साडे सहा वाजता सुनावण्यात येईल. या निकालाकडे भारत आणि पाकिस्तान यांचे डोळे लागून राहिले आहेत. या वर्षी १८ ते २१ फेब्रुवारी पर्यंत या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली होती. कोर्टाचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल या बाबत सध्यातरी कोणताही तर्क लावणं अवघड आहे. परंतु, हा निकाल जर भारताच्या बाजूने लागला तर हा भारतासाठी मोठा विजय मानला जाईल. जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल मान्य करण्यासाठी कोणताच देश बांधिल नाही. पण याच वर्षी जानेवारी महिन्यात पाकिस्तान विदेश मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितलं होतं की जर हा निकाल भारताच्या बाजूने लागला तर आम्ही तो मान्य करू.
पाकिस्तानच्या एका सैन्य न्यायालयाने एप्रिल २०१७ रोजी जाधव यांना दहशतवाद व हेरगिरीच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. या नंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात या प्रकरणी दावा दाखल केला. ज्येष्ठ विधिज्ञ हरेष साळवे या प्रकरणी कुलभूषण जाधव यांची बाजू न्यायालयात मांडत आहेत. या प्रकरणी सुनावणी चालू असताना कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांची भेट घेतली होती.