आज पहाटे पुण्यात त्यांच्या राहत्या घरी झालं निधन
पुणे, दि. २०: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक जयंत नारळीकर यांचं आज पहाटे पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण तसंच पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवलं होतं. ब्रिटनमधल्या केंब्रिज इथून डॉक्टरेट आणि रँग्लर या प्रतिष्ठित पदव्या घेतल्यानंतर त्यांनी १९७२ मध्ये मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्थेत खगोलशास्त्र विभाग प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली. फ्रेड हॉयल यांच्यासह त्यांनी मांडलेला हॉयल-नारळीकर सिद्धांत प्रसिद्ध आहे. पुण्यात आयुका या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख सहभाग होता. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी ‘पोस्टकार्डावरील विज्ञान’ सारख्या अभिनव कल्पना राबवल्या. विज्ञानकथांबरोबरच विज्ञानावरील विपुल लिखाण त्यांनी केले. त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
भारताची विज्ञानाधिष्ठीत प्रतिमा उजळवणारा आणि खगोल शास्त्रातील महत्ता सिद्ध करणारा महान वैज्ञानिक सुपूत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्भविभूषण, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाला, असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना महाराष्ट्रातील नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Source – AIR
