लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना
मुंबई, दि. २२ : ठाण्यातील मौजे कावेसर येथील सर्व्हे क्रमांक १२९ मधील वन विभागाच्या जमिनीवर झालेल्या बांधकामासंदर्भातील प्रकरणावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी महसूल आणि वन विभागाने संयुक्त पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
या प्रकरणासंदर्भात अजित नथुराम पाटील यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने विधानभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महसूल विभाग, ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
निवेदनानुसार, कावेसर येथील वनजमिनीच्या नोंदीत कथित बदल करून बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन झाल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची सर्वांगीण तपासणी आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
उपाध्यक्ष बनसोडे यांनी सर्व संबंधित विभागांना महसूल नोंदी, वन नोंदी, बांधकाम परवानग्या आणि इतर आवश्यक कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश दिले. या प्रक्रियेनंतर वस्तुनिष्ठ आणि तथ्याधारित संयुक्त अहवाल प्राधान्याने सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणात कायदेशीर निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती एकत्रित करण्यावर भर देण्यात आला असून, संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
