वडाळ्यात इंधन चोरीचे रॅकेट उघड; अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कारवाईत सव्वा कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
मुंबई, दि. १७ : मुंबईतील वडाळा परिसरात इंधन चोरीचे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा पर्दाफाश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दक्षता पथकाने केलेल्या धडक कारवाईत झाला आहे. पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाची बेकायदेशीररीत्या चोरी करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली असून या कारवाईत सुमारे १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अन्न, नागरी पुरवठा विभागाचे नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली १६ जून २०२६ रोजी दक्षता पथकाने वडाळा परिसरात छापा टाकला. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान दोन इंधन टँकरमधून इंधनाची चोरी सुरू असल्याचे उघडकीस आले. तपासात टँकरवरील अधिकृत सील तोडून त्यातील इंधन प्लास्टिकच्या कॅनमध्ये भरले जात असल्याचे निदर्शनास आले.
दक्षता पथकाने घटनास्थळी एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले. तपासादरम्यान २० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅन, प्लास्टिक पाईप आणि विशेष व्हॉल्वचा वापर करून टँकरमधून इंधन बाहेर काढले जात असल्याचे आढळून आले. संबंधित साहित्य जप्त करण्यात आले असून त्याचा वापर करून इंधन चोरीचे जाळे चालवले जात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान तपासण्यात आलेल्या एमएच-०४ केयू-१८२६ क्रमांकाच्या टँकरमध्ये सुमारे १० हजार लिटर पेट्रोल आणि १४ हजार लिटर डिझेल असल्याचे आढळून आले. तसेच एमएच-०४ एलवाय-६३८८ क्रमांकाच्या दुसऱ्या टँकरमध्ये सुमारे २९ हजार लिटर विमान इंधन असल्याचे निष्पन्न झाले. या सर्व इंधनसाठ्यासह संबंधित टँकर आणि इतर साहित्य असा एकूण १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईमुळे इंधन वाहतुकीदरम्यान होणाऱ्या संभाव्य गैरव्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः विमान इंधनासारख्या संवेदनशील इंधनाची चोरी होत असल्याचे उघड झाल्याने संबंधित यंत्रणांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
ही कारवाई दक्षता पथकातील उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे, उपनियंत्रक माधुरी शिंदे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, शिधावाटप अधिकारी गणेश पवार, सहायक शिधावाटप अधिकारी योगेश्वर मोरे तसेच शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, विकास नागदिवे, राहुल इंगळे आणि अरुण काते यांनी संयुक्तपणे पार पाडली.
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या इंधनाचा स्रोत, चोरीमध्ये सहभागी असलेली इतर व्यक्ती, तसेच चोरीचे इंधन कुठे आणि कोणाला पुरवले जात होते याबाबत सखोल तपास सुरू आहे. संबंधितांविरोधात आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्यात पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठा साखळीची सुरक्षितता आणि पारदर्शकता कायम राखण्यासाठी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
