कामाचे तास, डीएसीपी योजना आणि गट-अ अधिकाऱ्यांसाठी कल्याण निधीच्या प्रस्तावाचा होणार विचार
मुंबई, दि. २४ : राज्यातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाने विशेष समिती स्थापन केली आहे. कामाचे तास निश्चित करणे, पदोन्नतीशी संबंधित डायनॅमिक अॅश्युअर्ड करिअर प्रोग्रेशन (डीएसीपी) योजना महाराष्ट्रात लागू करण्याची शक्यता तपासणे आणि गट-अ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कल्याण निधी उभारण्याबाबत ही समिती अभ्यास करून शासनाला शिफारशी सादर करणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार २३ नोव्हेंबर २०२६ रोजी समिती गठित करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, गट-अ (मॅग्मो) यांनी विविध मागण्या शासनासमोर मांडल्या होत्या. या मागण्यांवर १६ सप्टेंबर २०२६ रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर संबंधित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेऊन त्यावर अंमलबजावणीयोग्य उपाय सुचवण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.
कामाचे तास आणि डीएसीपी योजनेचा अभ्यास
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या लक्षात घेऊन त्यांच्या कामाच्या वेळांबाबत निश्चित धोरण असावे, या मागणीचा समिती अभ्यास करणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार तसेच अन्य राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या डायनॅमिक अॅश्युअर्ड करिअर प्रोग्रेशन (डीएसीपी) योजनेची माहिती घेऊन ती महाराष्ट्रात लागू करता येईल का, याबाबत शिफारशी केल्या जाणार आहेत.
डीएसीपी योजनेची राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा विचार समितीच्या अभ्यासात केला जाणार आहे.
कल्याण निधीच्या रचनेवरही विचार
गट-अ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कल्याण निधी योजना तयार करण्याचा प्रस्तावही समितीसमोर आहे. या योजनेची व्याप्ती, निधीची आर्थिक तरतूद, अधिकाऱ्यांना मिळू शकणारे लाभ आणि योजनेच्या अंमलबजावणीची पद्धत यांचा सखोल विचार केला जाणार आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयातील अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, मॅग्मो संघटनेचे प्रतिनिधी तसेच आरोग्य विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.
समितीच्या अभ्यासातून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणत्या उपाययोजना सुचवल्या जातात आणि शासन त्यावर काय निर्णय घेते, याकडे आता आरोग्य विभागातील अधिकारीवर्गाचे लक्ष लागले आहे.
*संग्रहित छायाचित्र

