छगन भुजबळ प्रकरणावर संजय राऊतांचा तपास यंत्रणांवर हल्लाबोल
मुंबई, दि. २४: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष, ईडी आणि राज्याच्या गृह खात्यावर जोरदार टीका केली आहे. भुजबळ अडीच वर्षे तुरुंगात होते, मात्र त्यांच्या सर्व प्रकरणांमध्ये ईडीपासून ओडब्ल्यूपर्यंत त्यांना निर्दोष ठरवण्यात आले असल्याचा दावा राऊत यांनी केला.
“छगन भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहिले, पण भुजबळांच्या सर्व प्रकरणात ईडीपासून ओडब्ल्यूपर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला. याबद्दल या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायश्चित घेतलं पाहिजे, माफी मागितली पाहिजे,” असे राऊत म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत म्हटले, “सर्वात भ्रष्ट पक्ष जर देशात कोणताही असेल, तर तो भारतीय जनता पक्ष आहे. जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे, तोपर्यंत सगळे मनानं, तनानं, धनानं भाजप बरोबरच राहणार. ज्या क्षणी ही सत्ता पालट होईल, त्या क्षणी ही मनं बदलतील आणि मग ते आमच्याबरोबर असतील.”
सिंचन घोटाळ्यावर भाजपच्या इशाऱ्यांना प्रत्युत्तर
भाजपकडून सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडण्याच्या दिलेल्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “तुम्ही त्यांना एकदा क्लीन चीट दिली आहे ना. स्वतः प्रधानमंत्र्यांनी गर्जना करून पण ते सरकारमध्ये आले, आता कोणत्या तोंडाने तुम्ही त्यांची फाईल ओपन करणार आहात? त्या फाईलमध्ये काय आहे की नुसत्या डरकाळ्या फोडताय पोकळ?”
महापौर निवडणूक आणि महायुतीतील अंतर्गत तणाव
महापौर निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याच्या मुद्द्यावर बोलताना राऊत यांनी महायुतीतील अंतर्गत स्थितीवर भाष्य केलं. “शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतात आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत, त्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे,” असे ते म्हणाले.
‘गुलामांचा बाजार’
राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचं राजकारण शिसारी आणणारं झालं आहे. इथं गुलामांचा बाजार भरला आहे. माणसाच्या मताला, विचाराला आणि जगण्याला काही किंमतच ठेवली नाही. सर्व काही पैशानं, तोही भ्रष्ट पैशानं तोललं जातं.”
यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका करत म्हटलं,
“भारतीय जनता पक्षाचे जे मांडलिक राजे आहेत एकनाथ शिंदेंसारखे, ते सुद्धा स्वतःला या राज्याचे बादशाह समजून या गुलामीच्या बाजारामध्ये बोली लावत आहेत.”
शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय भूमिकांबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असा मी विचार करतो. शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहेत.”
अजित पवारांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटलं, “दोन दगडावरती पाय कसे ठेवणार? त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल आणि काहीतरी एक स्वीकारावं लागेल. अजित पवारांचं मन मूळ कुटुंबाकडे आहे, त्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत सामील होईल.”
